ज्या दिवशी युतीसंदर्भात शिवसेनेचा निर्णय होईल त्या दिवशी घोषणा करू – प्रकाश आंबेडकर

नागपूर : २२ जानेवारी – एकीकडे राज्यात शिवसेनेतून फूट पडल्यामुळे समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दोन गटांमध्ये निवडणूक आयोगासमोर लढा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा भिडू मिळण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी ठाकरे गटाची युती होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनीही बोलणी सुरू असून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यास हरकत नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “सध्या रेखाताई ठाकूर रायगडमध्ये आहेत आणि मी विदर्भात आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा एकतर माझ्याकडून व्हायला हवी किंवा त्यांच्याकडून व्हायला हवी. घोषणा कधी होईल? तर बोलणी करण्यासाठी दोन्ही बाजूंचे गट बसलेले आहेत. त्यांचं अंतिम झालं की त्यानुसार घोषणा होईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही”, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबतची बोलणी फिसकटली होती. तेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरही त्यांनी भूमिका मांडली आहे.
“उद्धव ठाकरेंना वाटतंय की आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे. तो त्यांचा मुद्दा आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही सोबत घ्या, आम्ही त्यांचं स्वागत करू. ज्या दिवशी यासंदर्भात शिवसेनेचा निर्णय होईल, त्या दिवशी आम्ही घोषणा करू आणि पुढे जाऊ”, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
“माझा काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध नव्हता. आम्हीच मागच्या लोकसभेत काँग्रेसला म्हटलं होतं की तुम्ही ज्या १२ जागा पाच वेळा हरलेला आहात, त्यातल्या किती शेअर करताय ते सांगा. दुर्दैवाने त्यांनी ते मान्य केलं नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलंय. कारण त्यांचं दोघांचंही म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाची ब्रीफ दलितांपुरतीच मर्यादित राहावी. ओबीसी-गरीब मराठ्यांविषयी आम्ही बोलू नये ही त्यांची अट आहे. ती आम्ही मान्य करायला तयार नाही आहोत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply