पुण्यातील मनसे जिल्हाध्यक्षांवर राहत्या घरासमोर गोळीबार

पुणे : २२ जानेवारी – पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडानी हा गोळीबार केला आहे. कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
गुंडानी समीर यांना धमकी दिली. त्यासोबतच पैशाची मागणीदेखील केली. “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.
कुख्यात गुंडाने समीर यांच्या दिशेनं गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला. यावेळी समीर थिगळे यांचं कुटुंब घटनास्थळी हजर होतं. गुंडानी त्यांंच्यासमोरच समीर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या सगळ्या घटनेत मात्र कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply