४ वर्षांची मुलगी व एक महिन्याच्या बाळासह विवाहितेची विहिरीत उडी

सांगली : ८ फेब्रुवारी – सांगली जिल्ह्यातील विटा याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका विवाहितेनं आपली चार वर्षांची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळासह हृदयद्रावक शेवट केला आहे. संबंधित महिलेनं आपल्या दोन्ही लेकरांसह घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
सोनाली बिहुदेव हत्तेकर असं आत्महत्या करणाऱ्या २६ वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या विटा येथील शाहूनगर परिसरातील रहिवासी आहेत. मृत सोनाली यांनी आपली चार वर्षांची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी मारली आहे. या दुर्दैवी घटनेच तिघांचाही नाकातोंडात पाणी शिरून मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनाली हत्तेकर या शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा क्र. 13 परिसरात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला होत्या. घटनेच्या दिवशी सोमवारी सकाळी सोनाली आपल्या दोन्ही मुलांसह घरातून बाहेर पडल्या होत्या. दोन्ही मुलं आणि सोनाली घरातून गायब झाल्यानं कुटुंबीयांनी तिघांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथील राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळले आहेत.
हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच शितोळे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. संबंधित विवाहितेनं आपल्या मुलांसह नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. किरकोळ कौटुंबीक वादातून ही आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply