अधुरं प्रेम..- नंदकुमार वडेर

… नेहमी निळयाभोर दूरस्थ आकाशाच्या प्रांगणात बसून शशांक आपले प्रेमाचे रूपेरी जाळे वसुंधरेवर टाकून बसलेला असतो.. अन तो चांदणचुरा वसुंधरा आपल्या अंगा प्रत्यंगाला लेपून घेते तेव्हा तीच्या कायेवर रोमांच उठत असतात..सिमट रही है अपनी बाहोमें सारखी. एक गोड धुंद शिरशिरी सर्वांगातून सळसळत जाते. कल्पांताच्या अंतरावर असलेले शशांक नि वसुंधरा एकमेकांच्या अंतरात कधीच उतरलेले असल्याने भौतिक अंतराचा त्यांना विसर पडलेला असतो.. मग आंख मिचौली सुरू होते निशब्द प्रेमाचा संवाद सुरु होतो. ते नयन बोलले काही तरी असचं त्या दोघांना सारखं जाणवतं..स्पर्शाला आसुसलेल्या मनाची तगमग बघत राहू दे तुझ्याकडे वर शांत करावी लागते.. तो मिलनाचा अपूर्व क्षण एकदा तरी यावा अशी जीवाची घालमेल दोन्ही बाजूला तितकीच उत्कटता वाढीस लावत असते.. पण पुढाकार कोणी नि कसा, कधी घ्यावा याचा निर्णय मात्र कायमच अनिर्णित राहिलेला असतो..पाॅंव पडी जंजीर सारखी वसुंधरा आपली हतबलता शशांकला सांगते आणि त्यालाच म्हणते कि डोली सजा के रखना लेने आना तेरी ओ गोरी.. आता शशांकला धीर असत नाही आणि तो येणार असतो.. खरचं एका रात्री तो नभांगणातून बाहेर पडतो हळुच वसुंधरेकडे येऊ लागतो.तेव्हा त्याचा चेहरा आनंदाने निखरून जातो सगळीकडे रूपेरी रूपेरी प्रकाशाची उधळण होत जाते.. आणि वर नभांगणात अमावस्येचा काळोख पसरत गेलेला असतो… वसु मी आलो गं..तू सांगिलसं तसाच आलो बघ,तुला न्यायला..वसुंधरेला कधी एकदा कवेत घेतो आणि तसचं तिला आपल्या घरी घेऊन जातो याची त्याला घाई झालेली.. एक निवांत अंधाराचा आसरा त्याला हवा असतो आपल्या वसुला पहिलं वहिलं आलिंगन दयायला.. तो तिच्या भोवती फिरत शोधत असतो , अंधार असलेली निवांत जागा. पण त्याला ती कुठेच सापडत नाही.स्वताच्या चंदेरी प्रकाशाची झळाळी मात्र सगळीकडे त्याला लख्ख दिसत राहते.वसुंधरा चुळबुळ करत आपला साडीचा पदर चुरगाळत नाराजी प्रगट करत राहते.. धुसफुसत राहते.याचं काही लक्षण खरं नाही असं तिला वाटतं राहतं.. रात्र भर शशांक तिच्या भोवती फिरत राहतो पण त्याला हवी असलेली स्पेस काही शेवटपर्यंत त्याला मिळत नाही.. रात्र सरत सरत जाते उषा आता उंबरठ्यावरून येत असते.. आणि इकडे शशांक निराश होऊन मनात चरफडत चरफडत स्वस्थानी निघू लागतो…

नंदकुमार वडेर, सांगली.
9920978470.

Leave a Reply