हडसचे कीर्तिवंत सहाध्यायी – मनीषा राजू

नागपूरच्या हडस हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज या शिक्षणसंस्थेला यंदा ८० वर्ष पूर्ण होत आहेत, गत ८० वर्षात या शाळेने अनेक गुणवंत आणि कीर्तिवंत कर्तृत्ववान विद्यार्थी दिले आहेत. यात सर्वच क्षेत्रात गाजत असलेले विद्यार्थी सापडतील, सेबी या राष्ट्रीय संस्थेचा प्रमुख असलेला चंद्रकांत भावे जसा हडसचा तसाच रामायण या दूरदर्शन मालिकेत भरताची भूमिका साकारणारा संजय जोग हा देखील हडसचाच माजी विद्यार्थी, डीआरडीओचा संचालक रवींद्र हस्तक, कोटक महिंद्रा बँकेचा एक्झेक्युटिव्ह व्हॉइस प्रेसिडेंट प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचा अतिरिक्त विक्रीकर आयुक्त डॉ. किशोर गोहोकर , आयुर्विमा महामंडळाचा कार्यकारी संचालक निलेश साठे, अशी विविध क्षेत्रात गाजलेली नावे सांगता येतील.
मी स्वतःदेखील हडसचाच माजी विद्यार्थी असल्यामुळे यातील अनेकांशी माझा व्यक्तिगत संबंध आलेला आहे. इतर अनेकांची मला व्यक्तिगत माहिती देखील आहे. त्यामुळेच मी पंचनामा न्यूज पोर्टलवर अश्या गुणवंत कीर्तिवंतांची माहिती वाचकांना करून देण्याचे ठरवले आहे.
आज या मालिकेत मी चेन्नई येथील ख्यातनाम चित्रकार सौ. मनीषा राजू यांचा परिचय वाचकांना करून देत आहे. हा परिचय रमेशचंद्र दीक्षित यांनी लिहिला आहे मनीषा राजू या हडसच्या १९८५ बॅचच्या विद्यार्थिनी आहेत.
हा उपकेम वाचकांना आवडेल हा विश्वास आहे, वाचकांनी त्यांच्या माहितीत असलेल्या हडस हायस्कुलच्या इतर गुणवंतांचीही माहिती कळविल्यास पंचनामा आपला आभारी राहिल.

अविनाश पाठक

‘कुंचल्याची किमया – रमेशचंद्र दीक्षित

श्री विष्णू’

किंचित गूढ पण प्रसन्न रंगसंगती, समभंग आकृती, ध्यानस्थ मुद्रा. डोक्यावर डौलदार नागछत्र, निळ्या ललाटी ठसठशीत उभट गंध, मकरकुंडले, सरळ यज्ञोपवीत, उराशी कवटाळलेले कमलपुष्प व त्याचे लयबद्ध मृणाल (देठ) हे घटक वैशिष्ट्यपूर्णच. दोन्ही हातांच्या फटीतून दिसणाऱ्या नागाच्या धुसर वेटोळ्या छानच.
मुख्य म्हणजे चित्रचौकटीत आकृती व रंगांचा तोल नीट सांभाळला गेलाय…एकूण सुंदर चित्र पाहिल्याचे समाधान देणारी रचना!
श्री विष्णू’ च्या सुंदर चित्राने पाडलेल्या मोहिनीमुळे हा शब्दप्रपंच उभा झाला.

चित्रकार मनिषा राजू

    उपरोक्त श्री विष्णूचे चित्र चेन्नईस्थित चित्रकर्ती डॉ.मनिषा राजू हिचे आहे.
    ' चित्रकार डॉ. मनिषा राजू' म्हणजे  B Sc, MA, MBA, Ph D असे उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व. या पदवीसंग्रहात चित्रकलेतील कुठलीही पदवी दिसत नसली तरी डॉ. मनिषा राजू यांना चित्रकलेतील 'ऑनररी डॉक्टरेट' मिळावी असे त्यांचे या क्षेत्रातील कार्य बघितल्यावर आपणासही वाटेल. त्यांनी चित्रकलेचे रितसर उच्च शिक्षण घेतले नाही हे खरे, परंतु नागपूरच्या 'हडस हायस्कूल' मध्ये विद्यालयीन शिक्षण घेतांना शिकविण्यात येणाऱ्या चित्रकलेत त्यांना चांगली गती होती. चित्रकला विषयाने त्यांना भूरळच पाडली होती म्हणाना.. आणि आता त्यांची चित्रे रसिकांना भूरळ पाडताहेत. 
       'डाॅ.मनिषा राजू' म्हणजे शंभर टक्के मराठी असलेली सौ.मनिषा राजू दुर्शेट्टीवार. पूर्वाश्रमीची कु.मनिषा हरिहरराव गुगिलवार..मुख्य म्हणजे आपल्या नागपूरची. लग्नानंतर ती 'चेन्नई'कर झाली. तिचे पती चित्रकार राजू दुर्शेट्टीवार हे मूळचे यवतमाळचे, परंतु वडीलबंधू प्रसिद्ध अॕडव्हर्टायजिंग फोटोग्राफर शशिकांत व्यवसायानिमित्त चेन्नईला स्थित असल्यामुळे राजू व मनिषा सुद्धा, त्यांच्या कलाविष्कारासाठी व कलाविस्तारासाठी चेन्नईकर झाले. चेन्नईतील सागरकिनारी असलेल्या निसर्गरम्य 'चोलामंडल आर्टिस्ट व्हिलेज' येथे १९९८पासून या चित्रकार दांपत्याचे आता-आतापर्यंत वास्तव्य होते. हे सुप्रसिद्ध 'चो.आ.व्हि.' फक्त कलावंतांसाठी कलावंतांनीच निर्मिलेली वस्ती आहे. माझे चेन्नईस बरेचदा जाणे झाले. तेथे दुर्शेट्टीवार कुटुंबास भेटलो असता हे आर्टिस्ट व्हिलेज बघितले. येथे मोठे कलासंग्रहालय असून नवोदितांसाठी कार्यशाळा, कलाशिबिरे, चित्रनिर्मिती, प्रदर्शने इ. उपक्रम सुरू असतात. 
      अशा कलानगरीत दुर्शेट्टीवार दाम्पत्याचे कलाजीवन न फुलते तरच नवल! राजू दुर्शेट्टीवारांनी 'अमूर्त' कलाप्रकारात (Abstract painting) मोडणाऱ्या स्वतःच्या विशेष चित्रशैलीने कलाप्रांतात आपला ठसा उमटवला.
        मनिषाने स्वतःची वेगळी चित्रवाट निवडली. पूर्णपणे वास्तववादी नसली तरी त्याच चित्रकलेच्या कडेने जाणारी ही वाट आहे. कौतुक म्हणजे मनिषाने वास्तवतेच्या वाटेवर आपल्या कल्पनांची, विचारांची, विशेष रंगसंगतीची पखरण करून ती वाट आपल्या बाजूने वळविली. म्हणजे ही शैली पूर्ण वास्तववादी (Realistic) किंवा अलंकरणात्मक (Decorative) नसून दोन्ही प्रकारांचा सुंदर मिलाफ म्हणता येईल अशी ही विशिष्ट शैली. रंगनिवड, विचारप्रवणता आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या कलामर्यादांची असलेली स्पष्ट जाणीव मनिषा राजूचे विशेष गुण आहेत. या गुणवैशिष्ट्यांमुळे व गेल्या बऱ्याच वर्षांपासून व्रतस्थपणे सुरू असलेल्या चित्रनिर्मितीमुळे मनिषाने आपले स्वतंत्र अस्तित्व कलाविश्वात निर्मिले आहे.. इतके की ललित कला अॕकेडमी, दिल्ली तर्फे राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी निर्णायक (Jury) म्हणून तिला मानाचे निमंत्रण होते. शास.चित्रकला महाविद्यालये, कलाशिबिरे येथे तज्ञ मार्गदर्शक नात्याने भाषणासाठी किंवा प्रात्यक्षिकासाठी तिला नेहमी बोलावणे असते. 
       तिच्या चित्रांची एकल, तसेच युगल किंवा समुहाने भरवलेली चित्रप्रदर्शनांची संख्याच अर्ध शतकाच्या घरात आहे. दिल्ली,मुंबई,पुणे,नागपूर,हैद्राबाद,बंगलुरू,चेन्नई,कोइंबतूर,पाँडिचेरी,कोचीन आदी शहरे तिच्या चित्रांनी काबीज केलितच पण भारताबाहेरील लंडन,सिंगापूर, मलेशिया, क्वालालंपूर इत्यादींच्या कलाप्रांगणात तिचे इंद्रधनुषी रंग अवतरले. मनिषाचे भाग्य, की या कलाप्रदर्शनानिमित्ताने कलाश्रेष्ठींचा व थोरामोठ्यांचा सहवासही तिला लाभला. यात शास्त्रीय गायक पं.जसराज, सिनेदिग्दर्शक मणीरत्नम,अभिनेत्री रेवती,पियानोवादक अनिल श्रीनिवासन,मोहिनीअट्टम नर्तकी गोपिका वर्मा,चित्रकार अर्पना कौर, राजकारणी कनिमोझी, सिंगापूर कौंसिलट व अमेरिकन कौंसिलेट                          आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. 
     आतापर्यंतच्या वाचनावरून काहींचा समज होऊ शकतो की प्रसिद्धी हव्यासापायी मनिषा हे सारे करीत असावी..तर असे समजणे हा अन्याय होईल. तिला सामाजिक भान असण्याची ही काही उदाहरणे बघू.. आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील बराच भाग घनदाट वनक्षेत्र असल्याने तेथील रहिवासी मुलांचा आधुनिक प्रगतीशी संबंधच नाही. मनिषाने, तिची बहीण संगीताच्या मदतीने अशा माघारलेल्या मुलांसाठी कलाशिबिरे घेतली. शिक्षण व चित्रकलेची गोडी लावली. गोंडीकला आणि वारली पेंटींगच्या साह्याने त्या मुलांची वर्तमान प्रवाहाशी ओळख करून दिली. मनिषा मूळची नागपूरकर असल्याने 'आपले नागपूर, सुंदर नागपूर' उपक्रमांतर्गत नागपूरच्या सौंदर्यीकरणात नवोदित सहकाऱ्यांसह चित्रे काढलीत..अशाप्रकारे मनिषाला  सुटा वेळ मिळाला की ती अशी सत्कारणी लावते. 
       कमनीय मानवी देह हा तिच्या चित्रांचा मुख्य घटक. मग या देहाकृती देवीदेवतांच्या असो वा सामान्य स्त्री-पुरूषांच्या..त्या सोज्वळता घेऊनच अवतरतात. तिच्या चित्रांमध्ये किळस, विभत्सता, अश्लीलता यांना अजिबात थारा नसतो. या त्याज्य गोष्टींना जसा थारा नसतो तसाच कुठल्याही अतिरेकीपणालासुद्धा तिच्या चित्रात स्थान नसते. त्यामुळे देवीदेवतांच्या बाह्यसौंदर्यावर भर देण्यापेक्षा 'त्यांचे आंतरसौंदर्य कसे दाखवता येईल' यावर तिचा कटाक्ष असतो. हे तिच्या चित्रांचे व अभिव्यक्तीचे मोठेच वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मनिषाच्या कुंचल्यातून अवतरलेले श्रीराम, श्रीकृष्ण, शिवपार्वती, लक्ष्मी, महाकाली, अर्धनारीनटेश्वर, दशावतार, भगवान बुद्ध आदी अनेक देवी-देवता कलारसिकांच्या संग्रही, कलादिर्घात, किंवा खाजगी बंगले,कार्यालयात विराजमान आहेत. तिच्या चित्रांना, इतर प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रकृतींसोबत लिलावात (Auction) स्थान मिळाले. 
       मनिषाचे चित्रविषय हे असे दैविक,आध्यात्मिक,आत्मशोध किंवा आत्मचिंतनपर..त्यातही शुद्ध भारतीय मुशीतून अवतरलेले असतात. ही दैवी व्यक्तिमत्त्वे इतरांनी चित्रित केलेली कितीतरी आपण बघतो. मग 'मनिषाचे वैशिष्ट्य काय?' असा प्रश्न कोणी तोंडावर मारू शकतो. त्यावर उत्तर असे की बहुतांश चित्रकार उपरोक्त व्यक्तिमत्त्वे विविध वस्त्राभूषणांनी नटलेली, तेजोवलय असलेली, कुठल्यातरी पौराणिक घटना प्रसंगात गुंतलेली, सोबत इतर काही सहकारी देवीदेवता किंवा पार्श्वभागी डोंगर,झरे,वनराई,पशुपक्षी आदी निसर्गदृश्ये चित्रीत केलेली असतात. परंतु मनिषा हा मोह आवरून देवांना जनसामान्याच्या पातळीवर आणते. त्यांच्यातील दुरत्व संपवते.  रसिकमनाला आंदोलित करणारे, अंतर्मुख करणारे तिचे चित्रविषय असतात. तिच्या चित्रविषयांबाबत एकदा तिला मी बोलते केले असता मनिषा म्हणाली-
      "मला असे वाटते, की मानव हा  स्थळ व काळाच्या मर्यादा असलेला या ब्रह्मांडातील एक अंशमात्र आहे. माझे चित्र मानवी मनाचा, त्यांच्या आध्यात्मिक अस्तित्वाचा, दैवी नात्याचा शोध घेतात. मला असे वाटते की स्वतःशी संवाद साधणे हे अधिक महत्त्वाचे आणि तेच मी माझ्या चित्रातून मांडण्याचा प्रयत्न करते. या धकाधकीच्या आणि यांत्रिक जीवनात हा संवाद कुठेतरी हरवत चाललाय. 
      माझ्या अभिव्यक्तीसाठी मी हिंदू पौराणिक पात्रांचा आधार घेते. कारण ते माझ्या मुळांशी जुळलेले आहेत. त्यातले लयबद्ध आकार, गूढ रंग, वेगळ्या जगात नेणाऱ्या संकल्पना, ईश्वरी ऊर्जा हे सर्वच मला खूप प्रेरणादायी वाटतात. जेव्हा ते आकार वेगळी आंदोलने घेऊन माझ्या कॕनव्हासवर अवतरतात तेव्हा ते दैवी शांततेचा आभास निर्माण करतात. मला आजच्या जगाकडे व जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात. चित्रांमधून मी स्वतःशी आध्यात्मिक संवाद साधण्याचा प्रयत्न करते."
      मनिषाचे उपरोक्त मनोगत तिची वैचारिक प्रगल्भता तर दर्शवितातच, शिवाय भारतीय अध्यात्म शास्त्रावरील विश्वास, दैवी पात्रांवरील प्रगाढ श्रद्धा व्यक्त करतात. त्यामुळे ही चित्रे निव्वळ व्यवसाय म्हणून तयार केली नसून, 'ही ब्रह्मीभूत दैवी पात्रे व मी' या शोधवृत्तीतून निर्मिली गेली आहेत..म्हणून ती रसिकमनाला सरळ स्पर्श करतात.मनिषाची चित्रे दर्शकांचे मन चाळवत नाही तर मनावर शांतरसाचा शिडकाव करतात. 
      मनिषाच्या चित्रांचे एक आणखी बलस्थान म्हणजे 'रंगसंगती'. उष्ण, शीत, समशीतोष्ण रंगसंगतीचा कधी सुटा तर कधी एकत्रित वापर करून मनिषा चित्रातून रंगोत्सवच साजरा करीत असते..आणि दर्शक त्यात हरखून जातात, हरवून जातात.. मनिषाची चित्रनिर्मिती बहुधा जलरंग, अॕक्रीलिक व रंगकांड्या (Dry/Soft pastels) या माध्यमातून होते. या माध्यमांवर तिची चांगली पकड आहे. या मानाने तैलरंगातील काम जरा कमीच. 
       कुंचल्यावर मनिषाची जशी हुकूमत आहे तशी लेखणीवरही आहे. कलाविषयक लेख, समीक्षा, कवितादी प्रकटीकरण तिच्या चित्रांप्रमाणेच लक्षवेधी असतात. वर उल्लेख केलेल्या तिच्या मनोगतावरून शब्दपारखी सहज जाणतील ह्याची खात्री आहे. 
      अशा बहुगुणी मनिषाचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ?

डॉ. मनिषा राजू यांचेशी संपर्कासाठी-
सेलफोन- 9884013019
Email- manisharaju_@hotmail.com

रमेशचंद्र दीक्षित, नागपूर
( लेखक आकाशवाणी-दूरदर्शन-चित्रपट-नाट्यकलावंत आहेत. त्यांची
साहित्य व चित्रकला क्षेत्रात रूची व सक्रिय वावर असून ते नागपूर येथील साहित्य कला सेवा मंडळचे माजी अध्यक्ष होते)

Leave a Reply