भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा, २०२२ करियरचा शेवटचा मोसम

मुंबई : १९ जानेवारी – भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी गेलेल्या सानियाने २०२२ तिच्या करियरचा अखेरचा मोसम असेल असं सांगितलं. म्हणजेच यावर्षी सानिया अखेरची टेनिस कोर्टात दिसेल. बुधवारी सानिया मिर्झाला महिला डबल्सच्या पहिल्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सानिया आणि युक्रेनच्या नादिया किचेनोकच्या जोडीचा स्लोवेनियाची तमारा जिडानसेक आणि काजा जुवानच्या जोडीने ४-६ ६-७(५) पराभव केला. याचसोबत सानिया महिला डबल्सच्या पहिल्याच मुकाबल्यात हारून स्पर्धेबाहेर जाली. असं असलं तरी सानिया ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिक्स डबल्समध्ये खेळताना दिसेल. मिक्स डबल्समध्ये सानिया अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळेल.
२०२२ माझ्या टेनिस करियरचं अखेरचं वर्ष असेल. मी प्रत्येक आठवड्याला पुढची तयारी करत आहे, पण मी पुढचा संपूर्ण मोसम खेळेन का नाही, याचीही खात्री नाही. मी आणखी चांगली खेळू शकते, पण शरीर साथ देत नाहीये, हे माझ्यासाठी दु:खदायक आहे.
सानिया मिर्झाने महिला डबल्समध्ये २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन, २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचा किताब जिंकला. तर मिक्स डबल्समध्ये तिने २००९ ऑस्ट्रेलियन ओपनर, २०१२ फ्रेंच ओपन आणि २०१४ यूएस ओपनमध्ये ट्रॉफी पटकावली.
३५ वर्षांची सानिया मिर्झा भारताची सगळ्यात दिग्गज महिला टेनिस खेळाडू आहे. २००३ साली सानियाने तिच्या प्रोफेशनल टेनिसला सुरूवात केली. मागच्या १९ वर्षांपासून ती टेनिस खेळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताला विजयही मिळवून दिला आहे. एवढच नाही तर आपल्या करियरमध्ये डबल्समध्ये सानिया नंबर एकवरही होती.
सानिया मिर्झा महिला सिंगल्समध्येही खेळली आहे, यात तिने आपल्यापेक्षा चांगलं रँकिंग असलेल्या खेळाडूंचाही पराभव केला आहे. सानियाने तिच्या सिंगल्स करियरमध्ये स्वेतलाना कुज्नेत्सोव, वेरा ज्वोनारेवा, मॅरियन बोर्तोली, पूर्व नंबर एक मार्टिना हिंगिस, दिनारा सफिना आणि विक्टोरिया अजारेंका यांच्यासारख्या स्टार खेळाडूंचा पराभव केला.
सानिया मिर्झाला कंबरेच्या दुखापतीमुळे सिंगल्समधून माघार घ्यावी लागली. भारताच्या दोन महिला टेनिस खेळाडूंनी आतापर्यंत डब्ल्यूटीए टायटल जिंकलं आहे, यात एक नाव सानिया मिर्झाचं आहे. सिंगल्सच्या टॉप-१०० मध्ये पोहोचणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. सानियाने २०१० साली पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केलं.

Leave a Reply