दिव्यांग मुलीचे दातृत्व पाहून सोनू सुदही भारावला

मुंबई : १४ मे – कोरोना महामारीमध्ये सोनू सूद एखाद्या देवदूतासारखा गरजूंच्या पाठीशी उभा आहे. सोनू सूद दररोज विविध पद्धतीने लोकांची मदत करत आहे. सोनूच्या या उपक्रमात अनेक मदतीचे हात सुद्धा पुढे येत आहेत. मात्र नुकताच सोनू सूदच्या फौंडेशनमध्ये अशा एका मुलीने मदतीचा हात दिला आहे. जी पैशाने नव्हे तर मनाने श्रीमंत आहे. या मुलीचं मोठं मन पाहून सोनूसुद्धा तिचा चाहता बनला आहे.
आंध्र प्रदेशच्या एका दिव्यांग मुलीने ही मदत केली आहे याबद्दल स्वतः सोनू सूदने ट्वीट करत माहिती दिली आहे. या मुलीचं नाव बोड्डू नागा लक्ष्मी असं आहे. ती एक युटयूबर सुद्धा आहे. सोनू सूदचं काम पाहून देशचं नव्हे तर विदेशी लोकसुद्धा सोनूचे चाहते झाले आहेत. मात्र सोनू या मुलीचा चाहता बनला आहे. या मुलीचं कौतुक करत सोनू सूदने एक ट्वीट केलं आहे, तसेच त्या मुलीचा फोटो पोस्ट करत, तिला भारतातील सर्वात श्रीमंत मुलगी असं म्हटलं आहे.
सोनूने ट्वीट करत म्हटलं आहे, ‘बोड्डू नागा लक्ष्मी ही एक दिव्यांग मुलगी आणि युटयूबर आहे. ती आंध्रप्रदेशमधील ‘वरीकुंटापाडू’ या छोट्याशा खेड्यात राहते. तिने सूद फौंडेशनमध्ये 15,000 रुपयांचा निधी मदत म्हणून दिला आहे. हा पैसा तिच्या 5 महिन्यांच्या पेन्शनचा आहे. ही माझ्यासाठी सर्वात श्रीमंत भारतीय आहे. तुम्हाला कोणाचही दुख पाहण्यासाठी फक्त डोळ्यांचीच गरज असते असं नाही. ही एक रियल हिरो आहे’. अशा आशयचा ट्वीट सोनूने केला आहे.
या मुलीच्या मदतीनंतर सोनूला अनेक लोकांनी विचारणा केली आहे, की कोणत्या पद्धतीने तेसुद्धा मदत करू शकतात. सोनू सूद रात्रंदिवस गरजूंच्या मदतीसाठी धडपड करत आहे. विविध शहरांमधून सोनूला मदतीसाठी फोन येत आहेत. आणि सोनूही त्यांना आवर्जून मदत करत आहे.

Leave a Reply