ओंजळीतील फुलं : १२ – महेश उपदेव

28 dec mahesh updeo final

राज्याच्या उपराजधानीत सामना सुरु झाल्यानंतर वाचकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. सामनातून लिखाण झालेल्या वृत्तांतून वाचकांना न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न होता. राज्यात कोणाचेही सरकार असले तरीही सामना मध्ये आलेल्या वृत्ताची दखल सरकारला घ्यावी लागत होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेहमी सांगायचे मी उठल्यानंतर प्रथम सामना वाचतो. कारण की त्यामध्ये आलेले वृत्त दखल घेण्यासारखे असते. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात एकमेव वृत्त असे सामनाचे नाव आहे. कोणता बॉंम्ब आज सामानाने टाकला हे पाहून कामाला सुरुवात करतो असे विलासराव देशमुख यांनी माझ्याशी बोलताना सांगितले होते. विरोधकांना सामनाची धडकी बसते नागपूरच्या आवृत्तीची सर्वांनाच दखल घ्यावी लागत होती.

विद्यापीठाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

सामना मधून मी विद्यापीठातील घोटाळे रोज उघडकीस आणत असल्यामुळे कुलगुरूंना धडकी बसली होती. रोज पोलखोल करणारी माहिती हा कुठून जमवतो या करीता कुलगुरूंनी माझ्यावर वॉच ठेवला होता “बोभाटेशाहीची – विकृतीशाही ” या मथळ्याखाली मी वृत्तमालिका चालवली होती. या वृत्तमालिकेने अनेकांना न्याय मिळाला विद्यापीठ साक्षात सरस्वतीचे मंदिर. या मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असते.
पाराशरांचे पान खाणे बंद केले
व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ सदस्य गौरीशंकर पाराशर यांचे विद्यापीठात मोठे नाव होते. त्यांचा आवाजाने दरारा पाहून विद्यापीठातील कर्मचारी घाबरत होते. पाराशर सिनेटच्या बैठकीत, विद्यामंदिर बसून तोंडात पानाचा कोबरा भरून बसायचे आणि पाणी प्यायच्या ग्लासमध्येच पान थुंकायचे, हा प्रकार मी पाहिल्यानंतर माझे डोके सरकले. यावर मी वृत्तमालिका चालवून त्यांचे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये बसून पान खाणे बंद केले. पुरभैय्या पाराशर या मथळ्याखाली वृत्तमालिकाच चालवली होती. तेव्हापासून गौरीशंकर पराशरांनी आपली चूक कबुल करून पान खाणे बंद केलॆ.
१९९७ मध्ये माझी वृत्तमालिका चांगलीच गाजली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे काम सुरू होते. माझे ज्येष्ठ सहकारी अरुण निगवेकर विद्याधर चिंदरकर यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत होते. रोज नवनवे अनुभव येत होते. आम्ही न डगमगता व कुणाचीही गय न करता बिनधास्तपणे लिखाण करीत होतो.

अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानाचा पुरस्कार

१९९७ मध्ये मला माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजितबाबू देशमुख यांचे पिताश्री अरिविंदबाबूं देशमुख यांच्या नावाने असलेला प्रतिष्ठानाचा शोध पत्रकारिता प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. सामनाच्या वृत्ताची दखल घेऊन माजी मंत्री रणजित देशमुख यांनी मला शोध पत्रकारिता प्रथम पुरस्काराची घोषणा केली.
तत्कालीन महाराष्ट्र टाइम्सचे संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते मला अरविंदबाबू देशमुख शोध पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. योगायोग असा कि मला क्रीडा पत्रकारितेतील नाशिकराव तिरपुडे प्रतिष्ठानचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. हा दुसरा पुरस्कारही महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आता खासदार असलेले कुमार केतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारामुळे माझ्या लेखणीला एक चांगलीच धार आली. आणि मला प्रोत्साहनही मिळाले. ही माझ्याकरिता जमेची बाजू होती. विदर्भवादी असलेल्या रणजितबाबू देशमुख यांच्या संस्थेचा हा पुरस्कार होता. या पुरस्काराने माझी हिम्मत वाढली. त्यानंतर मी मागे वळून बघितलेच नाही. अनेक राजकीय बातम्या गुन्हेगारी बातम्या व क्रीडा क्षेत्रातल्या बातम्यांमुळे अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळाला. या दरम्यानच मला माजी खासदार श्री. वा. धाबे यांच्या क्रीडा मंडळाचा २१ हजार रुपयाचा उत्कृष्ट क्रीडालेखन केल्याचा पुरस्कार देऊन माझा गौरव केला होता.
नूतन भारत युवक संघाचे संस्थापक सदस्य, माजी नगरसेवक, सायकलपटू माजी महापौर संदीप जोशी यांचे सासरे प्रकाश साठे यांनी एका स्पर्धेदरम्यान मला उत्कृष्ठ क्रीडा पत्रकार म्हणून एक सायकल भेट दिली होती. ही सायकल आजही मी जपून ठेवली असून रोज सकाळी सायकलने फिरायला जातो. शहरात कोणतिहि घटना घडली तरीही शक्यतो घटनास्थळी जाऊन घटनेची दखल घेऊन वार्तांकन करतो हे प्रकाश साठे यांनी हेरले होते. त्याकाळी प्रकाश साठे यांनी सायकलचे महत्व पटवून दिले होते. इंधन बचावाचा नारा त्याचवेळी त्यांनी देऊन आपली शारीरिक क्षमता टिकवून ठेवायची असेल तर जीवनात सायकल महत्वाची असते हे प्रकाश साठे यांनी पटवून दिले होते. माझे मित्र असलेल्या प्रकाश साठे यांचा मृत्यूही सायकलवरून फिरून येत असताना श्रद्धानंद पेठ चौकात झाला होता. त्यावेळी मला प्रकाश साठे यांची आठवण झाली. प्रकाश साठे यांची खासियत होती सकाळी चार वाजता उठून अंबाझरीच्या तलावात पोहून निघाल्यानंतर शिट्टीवर गाणं गात किंवा माऊथ ऑर्गनवर गाणे गात ते सायकलने शहरात फेरफटका मारत होते.

जांबुवंतराव धोटे यांनी केले कौतुक

नागपूरमधून सामना प्रकाशित झाल्यानंतर विकासाच्या दृष्टीने युती सरकारचे प्रयत्न सुरु असताना कट्टर विदर्भवादी जांबुवंतराव धोटे यांनी परत एकदा विदर्भाची हाक दिली होती. संयुक्त महाराष्ट्रवादी आणि विदर्भवादी यांच्यात चांगलीच जुंपली होती. पत्रपरिषदेत त्यांना मी जय महाराष्ट्र म्हणायचो तर ते जय विदर्भ म्हणून आवाज द्यायचे. एका पत्रपरिषदेदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांच्या वक्तव्याची धोटे यांना आठवण करून दिली होती. साठे म्हणायचे आम्ही विदर्भाचा नाही स्वतःचा विकास केला. आमचे नेते त्यावेळी तीन “आर” (रम,रमा,रमी ) मध्ये गुंतले होते. हे सांगताच धोटे माझ्यावर थोडे नाराज झाले होते, तेव्हा ते म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे चांगले मित्र आहेत, ते अखंड महाराष्ट्रवादी होते पत्रकारांमध्ये तू एकटाच मला विरोध करतो याचे मला तुझे कौतुक वाटते. शेकडो विदर्भवाद्यांमध्ये तू अखंड महाराष्ट्राची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मी त्यांना एक आठवण करून दिली होती. आपण कृषी विद्यापीठासाठी जे आंदोलन केले होते, त्यावेळी नागपुरातील बडकस चौकात अश्रूधूर व गोळीबार झाला होता. आंदोलनकर्त्यांना पाणी पाजण्याचे काम मी करत होतो, त्यावेळी मी अवघ्या दुसऱ्या इयत्तेत शिकत होतो. आंदोलन कर्त्यांवर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी गल्ल्यागल्ल्यांमध्ये शिरून आंदोलनकर्त्यांना मारहाण सुरु केली होती. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यावर राखेने भरलेले मडके टाकले होते. त्या पोलिसाने चिडून वरती गोळी झाडली होती. त्यात मी सुदैवाने बचावलो. ही माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही माझ्या वॉकर रोडच्या घरी येऊन पाठीवरून हात फिरवला होता. आणि त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात इतवारीतील विदर्भ चंडिकेसमोर माझा सत्कार केला होता. ही आठवण त्यांना सांगताच त्यांना गहिवरून आले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर आमची चांगलीच मैत्री झाली. ते प्रतापनगरला आपल्या मुलीच्या घरी आले की माझ्या घरी आवर्जून येत होते. धोटे यांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत दोस्ती जपली होती. माझा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते लगेच मला घरी भेटायला आले होते. काही मदत लागल्यास मला कळव, तुझ्याकरिता मी कुठेही असलो तरी येईल अशा अनेक आठवणी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात संग्रही आहेत. जांबुवंतराव धोटे विदर्भवादी असले तरीही त्यांचे सामनावर विशेष प्रेम होते. ते कार्यालयात येऊन आमची भेट घ्यायचे. एव्हडेच

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply