चंद्रपूर : ३ जुलै – वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाळीव जनावरांचा पंचनामा करण्यासाठी व ट्रॅप कॅमेरा लावण्यासाठी घटनास्थळी केलेल्या वनविभागाच्या चमुला, ठार गायीवर ताव मारीत बसलेल्या दोन पट्टेदार वाघांनी हुसकावून लावल्याची घटना दाबगाव परिसरात घडली.
दाबगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाची दहशत निर्माण झालेली असून, सुशी येथील एका महिलेला वाघाने ठार केले. तर सुशी दाबगाव व परिसरातील अनेक गुरे, शेळ्या, मेंढ्यावर हल्ला करून त्यांना ठार करीत असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. दरम्यान, 1 जुलैला दाबगाव मक्ता येथील शंकर जुव्हारे या शेतकर्याची दुधाळ जर्शी गाय व बैलाला वाघाने ठार केले. यात त्या शेतकर्याचे मोठे नुकसान झाले.
त्यामुळे त्याचा पंचनामा करण्याच्या व कॅमेरा लावण्याच्या हेतुने वनविभागाचे वनरक्षक ठमके, वनकर्मचारी, गावातील काही नागरिक, गुरांचे मालक व सामाजिक कार्यकर्ते दुर्वास घोंगडे हे गेले होते. वन विभागाच्या या चमुने एका बैलाचा पंचनामा केला. कॅमेरा सुध्दा लावला. मात्र, त्याचवेळी त्यांना वाघाच्या पायाचे ठसे दिसले. वाघ निघून गेला असावा या विचाराने सगळी चमू दुसर्या दुधाळ गायीचा शोध घेत असताना ते थेट वाघाजवळच पोहोचले. दोन पटेदार वाघ ठार केलेल्या गायीवर ताव मारीत होते. चमू बघून वाघांनी डरकाळी फोडली आणि सगळ्यांची तारांबळ उडाली. वाघांनी त्यांना हुसकावले.
सारेच सैरावरा पळणार तेवढ्यात वनविभागाच्या चमुने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. कुणीही पळून जाऊ नका, अशी समज देत सगळ्यांना परतण्याचे निर्देश दिले गेले. त्यामुळे अनर्थ टळला.