सर्पदंशाने भंडाऱ्यात युवकाचा मृत्यू

भंडारा : २५ जुलै – कोसा बीज उत्पादन आणि संगोपन केंद्रांतर्गत जंगलातील झाडांवर कोसाबीज उत्पादनाचे काम करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव – धाबेटेकडी जंगलात उघडकीस आली आहे. या तरुणाचा मृत्यू विषारी सापाच्या दंशाने झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
माहितीनुसार, मार्कंड दयाराम शेंडे (वय 30) असं मृतकाचे नाव आहे. मार्कंड हा कोसा बीज उत्पादन आणि संगोपन केंद्रांतर्गत जंगलातील झाडांवर कोसा बीज उत्पादनाचे काम करीत होता. सदर बीज उत्पादनासाठी घटनेतील युवक नियमित सकाळच्या सुमारास स्थानिक पिंपळगाव-धाबेटेकडी जंगलात जात होता.
घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास कोसाबीज उत्पादनाचे कामासाठी पिंपळगाव धाबेटेकडी जंगलात गेलेला मार्कंड शेंडे हा दुपारपर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी संबंधिताची जंगल परिसरात जाऊन चौकशी केली. तेव्हा मार्कंड हा पिंपळगाव – धाबेटेकडी जंगलातील एका झाडाखाली नायलॉन पोतीवर जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. मार्कंडला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय घेत घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली गेली. माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला आहे.
यावेळी मृतकाचे डाव्या पायावर सर्पदंशाचे चिन्ह दिसून आल्याने संबंधित युवकाचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह लाखांदूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply