चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार

कोल्हापूर : १८ जून – कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले आहेत. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील हॉटेस सूर्या जवळ आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाऱ्यासह संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटनासमोर येत आहेत.
जिल्ह्यात वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गडहिंग्लज-आजरा मार्गावर अचानक आलेल्या वारा आणि पावसामुळे चालत्या दुचाकीवर झाड कोसळले आहे. यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू सतीश जोतिबा शिंदे (वय ३६, रा. अत्याळ) हे जखमी झाले. यात गंभीर दुखापत झाल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. सतीश हा आपल्या आजीला गावी घेऊन गेला होता. आज आजीला सोडण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. तो गडहिंग्लज शहरात हॉटेल सूर्यासमोरुन येत असताना अचानकपणे चालत्या दुचाकीवरच हे झाड कोसळले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र दोघांचाही रुग्णालयात दाखल होण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply