शिवजयंतीच्या बैठकीदरम्यान शिवसेना ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा, एकाने केला गोळीबार

नाशिक : २० जानेवारी – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट बैठकीसाठी जमले होते. तर त्याच ठिकाणी शिंदे गटातील काही कार्यकर्ते बैठकीसाठी जमले होते. या बैठकीवेळी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली यावरून दोन्ही गट आमनेसामने आले. यातून एका गटाने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या देवळाली गावात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलवलेल्या बैठकीत गोळीबार झाल्याची चर्चा आहे. शिवजयंतीच्या नियोजन बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याने हा राडा झाल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटाने शिवजयंतीच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्याचवेळी ठाकरे गटानेही त्याच ठिकाणी ठाकरे गटाकडून बैठकीचे आयोजन केले होते. बैठकी दरम्यान दोन्ही गट आमनेसामने आल्याने जोरदार वाद झाला. वादादरम्यान एका गटाकडून हवेत गोळीबार झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.
यामुळे मोठा गोंधळ झाला होता. तर काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कोणत्या गटाकडून गोळीबार करण्यात आला याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.
नाशिकमध्ये झालेल्या घटनेमुळे परिसरात मोठा जमाव जमला होता. पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Leave a Reply