क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात केली मेहुण्याची हत्या

गोंदिया : ३ जून – राग हा आपल्यासाठी घातक असतो. आपण रागाच्या भरात काहीही करुन मोकेळे होतो. काही लोकांचा रागावर ताबा राहत नाही. ते रागाच्या भरात नको ते करुन बसतात. नंतर त्या घटनेबाबत पश्चात्ताप व्यक्त करतात. अशीच काहिशी घटना गोंदियात घडलीय. एका व्यक्तीने क्षुल्लक कारणावरुन रागाच्या भरात थेट आपल्या मेव्हण्यावर वार केले. यामध्ये त्याच्या मेव्हण्याचा मृत्यू झाला
संबंधित घटना ही अर्जुनी तालुक्यातील प्रतापगड गावात घडली. आरोपी अब्दुल कादिर रशीद शेख (वय – 52 वर्ष) आपल्या कुटुंबासह गावात राहतो. त्याच्या शेजारीच त्याचा मेव्हुणा गौस मोहम्मद अजीज मोहम्मद शेख (वय 52 वर्ष) हा देखील राहायचा. अब्दुल आणि अजीज हे दोघं मजुरी करायचे. एकमेकांच्या शेजारी राहत असल्याने त्यांच्यात चांगले संबंध होते. मात्र, तरीही अब्दुल याने क्षुल्लक कारणावरुन अजीज याच्या पोटात चाकू खोपसून हत्या केली.
अब्दुलच्या घरात एका क्षुल्लक विषयावरुन वाद सुरु होता. तो आपल्या मुलाला या विषयावरुन बोलत होता. अब्दुलच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकून अजीज तिथे आला. त्याने आधी समजवण्याचा प्रयत्न केला. पण अब्दुल त्याच्या धुंदीत होता. या दरम्यान, माझ्या भाच्याला काही बोलू नकोस, असं अजीज त्याला म्हणाला. याच वाक्यावरुन अब्दुलने थेट अजीजच्या पोटात चाकू खुपसला. यामध्ये अजीजचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी अब्दुल याला ताब्यात घेतलं. मृतक अजीजच्या पत्नीने पोलिसात आरोपी विरोधात तक्रार केली. त्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा सध्या केशोरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply