मुंबई : ४ मे – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची Twitter वरची बोलती बंद झाली आहे. तिच्या पश्चिम बंगालविषयी केलेल्या ट्वीट्स आणि VIDEO मुळे सोशल मीडिया संस्थेने तिचं अकाउंट सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार ट्विटरच्या नियमांचं, धोरणांचं उल्लंघन केल्यामुळे तिचं अकाउंट कायमचं बंद करायचा निर्णय घेतला आहे. Twitter च्या प्रवक्त्यांनी याविषयी माहिती दिली.
गेले दोन दिवस म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवसापासून कंगनाच्या ट्विटर वॉलवर फक्त राजकीय शेरेबाजी आणि त्याविषयीच्याच कमेंट्स दिसत होत्या. बंगालमध्ये दिवसाढवळ्या हत्या सुरू आहेत, हिंसाचार भडकला आहे, असं सांगणारा एक VIDEO देखील तिने पोस्ट केला होता. तसा VIDEO तिच्या इन्स्टाग्राम पेजवरसुद्धा आहे.
यात तिने रडत रडत बंगालमधली परिस्थिती किती भीषण आहे याबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही तर केंद्र सरकारला आवाहन करत बंगाल वाचवा. तिथे राष्ट्रपती राजवट दाखल करा असंही सांगितलं होतं.
गेले दोन दिवस कंगना सातत्याने ममता बॅनर्जींविरोधात ट्वीट कर त आहे. रोहिंग्या, CAA, NRC सगळ्याबद्दल तिने कंमेट्स केल्या. बंगालची तुलना काश्मीरशीही करून झाली. शेवटी कोलकात्यामधील एका वकिलाने कंगनाविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. कंगना रणौत बंगालच्या लोकांना भडकवण्याचं काम करत आहे. तिच्या वक्तव्य आणि पोस्ट्समुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, अशी तक्रार या वकिलाने केली.
त्यानंतर ट्विटरनेही तातडीने कारवाई करत तिचं अकाउंट सस्पेंड केलं. कंगनाची मॅनेजर म्हणून काम करणारी तिची बहीण रंगोली चंडेल हिचं अकाउंटही गेल्या महिन्यात ट्विटरने काढून टाकलं होतं. द्वेषमूलक मजकूर लिहिल्याने ट्विटरच्या धोरणांचं उल्लंघन झाल्याचं सांगत त्या वेळी ट्विटरने कारवाई केली होती.