मुंबई : २० एप्रिल – महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या सुरूवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत आहे. आयपीएलच्या गेल्या १४ वर्षांच्या इतिहासात धोनीने मोठं यश मिळवलं आहे, सोबतच त्याने अनेक विक्रमदेखील केले आहेत. सुरुवातीपासूनच धोनी चेन्नईच्या संघाचा कर्णधार आहे. १९ एप्रिल २०२१ रोजी धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून २०० वा खेळला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळवण्यात आला. आयपीएलमधील कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा सामना आहे. धोनीने हा एक मोठा रेकॉर्ड आज आपल्या नावे केला आहे. धोनीने चेन्नईसह आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाचंदेखील नेतृत्व केलं आहे.
आयपीएलमधील एकाच फ्रँचायझीसाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरा नंबर विराट कोहलीचा लागतो. विराटने १२८ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचं नेतृत्व केलं आहे. विराटनंतर या यादीत रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्माने १२४ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे. धोनी 2008 पासून चेन्नई सुपरकिंग्स संघाचं नेतृत्त्व करतोय. तर कोहली २०१२ मध्ये पहिल्यांदा बँगलोर संघाचा कर्णधार झाला. 2013 पासून तो आरसीबीचा नियमित कर्णधार म्हणून खेळतोय. तर रोहित शर्मा २०१३ पासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून खेळतोय.