प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

मुंबई : १९ एप्रिल – प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. सोमवारी सकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं भारतीय मनोरंजनसृष्टीला एक जबरदस्त धक्का बसला आहे. चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुमित्रा यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर देखील शोककळा पसरली आहे.
सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी एकूण सुमारे 14 चित्रपट, 50 हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांची निर्मिती केली. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए केलं होतं. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केलं.

Leave a Reply