ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा याचे योग्य व्यवस्थापन करा – रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची सूचना

नवी दिल्ली : १९ एप्रिल – करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत असताना अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजनच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं समोर येतंय. याच दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिलाय. ऑक्सिजनच्या पुरवठ्यास चालना देण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधून काढण्यासाठी आरोग्य अधिकारी, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि खासगी क्षेत्रातील भागधारकांची भेट घेतल्याचंही आज पीयूष गोयल यांनी म्हटलंय.
देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याचं दिसून येतंय. रुग्णालयांत दाखल होऊनही ऑक्सिजन पुरवठा न होऊ शकल्यानं काही रुग्णांना प्राण गमवावा लागला आहे.
अशा वेळी पीयूष गोयल यांनी, ‘रुग्णांना जेवढी गरज असेल तेवढ्याच ऑक्सिजनचा वापर करावा. अनेक ठिकाणी गरज नसतानाही रुग्णांना ऑक्सिजन दिला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत’, असं ट्विट पीयूष गोयल यांनी केलं आहे.
माहितीनुसार, ‘राज्य सरकारनं मेडिकल ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवायला हवी. मागणी आणि पुरवठ्याचं व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. कोव्हिड १९ चा संसर्ग रोखण्याचं काम राज्य सरकारचं आहे, ही जबाबदारी त्यांनी निभवायला हवी’ असंही पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
‘कोव्हिड रुग्णांची संख्या अशाच अनियंत्रित पद्धतीनं वाढत राहिली तर याचा देशाच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होईल. आम्ही राज्य सरकारसोबत उभे आहोत, परंतु त्यांनी मागणीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे तसंच कोव्हिड संक्रमण रोखण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील’, असंही पीयूष गोयल यांनी म्हटलंय.

Leave a Reply