दोन दहशतवाद्यांचा लष्कराच्या बेसवर आत्मघाती हल्ला, ३ जवान शहीद

जम्मू-काश्मीर : 11 ऑगस्ट – राजौरीपासून 25 किमी अंतरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवाद्यांनी लष्कराच्या ऑपरेटिंग बेसवर आत्मघाती हल्ला केला. यावेळी भारतीय जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तर यामध्ये 3 जवान शहीद झाले आहेत. सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
सूबेदार राजेंद्र प्रसाद, राइफलमॅन मनोज कुमार आणि राइफल मॅन लक्ष्मणन डी. या तीन भारतीय जवानांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले आहे.
अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी परगलमधील लष्करी छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दोन्ही बाजूने चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूने सुरु झालेल्या गोळीबारात दहशतवादी मारले गेले. तर तीन भारतीय जवान शहीद झाले.
याआधी बुधवारी, बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले. गेल्या मे महिन्यात काश्मिरी पंडित कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येतही लतीफ राथेरचा हात होता. पोलिसांनी ही माहिती दिली होती. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ट्विट केले होते की, लष्कर-ए-तोयबाच्या तीन लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढण्यात येत असून, कोणाची ओळख पटलेली नाही. शस्त्रे आणि दारूगोळा घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. हे आमच्यासाठी मोठे यश आहे.”

Leave a Reply