मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा “पुगल्या”ने मारली बाजी

मुंबई : १३ एप्रिल – मराठी सिनेमा ‘पुगल्या’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजवला आहे. मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये पुगल्या सिनेमा सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे. दहा वर्षांचे दोन चिमुकले मित्र आणि त्यांचा छोटा कुत्रा अशी या सिनेमाची कहाणी आहे. विनोद सॅम पीटर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या सिनेमाची कथा सुनील प्रल्हाद खराडे यांनी लिहिली आहे. पुगल्या सिनेमाचा सर्वोच्च सन्मान झाल्यामुळे विनोद पीटर भारावून गेले आहेत. आमच्या कथेला दाद मिळते हे पाहून आनंद होतोय, असं त्यांनी म्हटलं. मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब आहे, असं पीटर म्हणाले
पुगल्या हा सिनेमा एका चिमुकल्यावर आधारित आहे. ऋषभ आणि दत्ता या दोन मुलांची ही कहाणी असून, जी मुलं दहा वर्षाच्या आसपास वयोगटातील आहेत, त्यांच्याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. एक शहरातील तर एक खेड्यातील असे हे मित्र. एका मित्राचं हरवलेलं कुत्र्याचं पिल्लू दुसऱ्याला सापडतं आणि ते कसे मित्र बनत गेले, ही साधी, सरळ पण प्रत्येकाला आपली वाटणारी ही कहाणी आहे.
या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मिळत आहे. या सिनेमाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आलं. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत.

Leave a Reply