संपादकीय संवाद – मृगजळामागे धावणारे संजय राऊत

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा सदस्यता संजय राऊत हे सध्या जम्मू काश्मीरमध्ये असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेतून ते दररोज माध्यमांना विविध प्रतिक्रिया देत नवे नवे वाद निर्माण करत आहेत. परिणामी सध्या ते विरोधकांच्या टिकेचेही लक्ष्य बनले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज संजय राऊतांचे शुद्धीकरण करायला हवे अशी सूचनाही दिली आहे.
ज्या शिवसेनेचे नाव घेऊन संजय राऊत राजकरण करत आहेत, त्या शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोधच केला होता, काँग्रेस पक्षावर आणि त्यातही नेहरू गांधी परिवारावर ते कायम आपल्या ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडायचे. त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत जावे हे बाळासाहेबांच्या समर्थकांना फारसे रुचले नाही.
बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधीही सत्तेसाठी आपल्या तत्वाची तडजोड केली नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाचा फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकरणात एक दबदबा होता, मात्र त्यांच्या वारसांनी बाळासाहेबांची परंपरा पुढे चालवली नाही. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी तडजोड केली. बाल्साशेब असतांना ते कोणत्याही राजकीय नेत्याकडे काही मागायला जात नव्हते, सर्व राजकीय नेते स्वतः बाळासाहेबांच्या घरी पोहोचायचे त्यावेळी बाळासाहेबांच्या अटींवर समोरच्या पक्षाशी तडजोडी होत.
ही परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी बदलली. महाराष्ट्रात सत्ता हवी म्हणून त्यांनी भाजपशी वाकडेपणा घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी तडजोडी केल्या ज्या सोनिया गांधींना बाळासाहेबांनी कायम उपहासात्मक भाषेत झोडपले, त्या सोनियाबाईंचे उद्धवपंतांनी पाय धरले. या सर्व प्रकारात संजय राऊत आघाडीवर होते.
आता त्याच संजय राऊतांनी राहुल गांधींबरोबर पदयात्रेत चालून शिवसेनेची उरलीसुरली इज्जत धुळीला मिळवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सत्तेसाठी किती लाचार व्हावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र हे करतांना आज देसष्ट काँग्रेसची आणि राहुल गांधींची काय अवस्था आहे, याचे भान संजय राऊत विसरले आहेत. राहुल गांधींबरोबर चालल्याने राहुल गांधी उद्या पंतप्रधान होतील, आणि शिवसेनाही केंद्रात सत्तेत येईल असा संजय राऊत यांचा अंदाज असावा, मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते तो भ्रम आहे. हे बघता संजय राऊत हे उगाचच मृगजळाच्या मागे धावत आहेत, हे स्पष्ट दिसते. मृगजळामागे धावून त्यांना काहीही फायदा होणार नाही, हे नक्की तरीही पंचानामातर्फे संजय राऊत यांना हार्दिक शुभेच्छा.

अविनाश पाठक

Leave a Reply