टँकरचालकाचा वाहन चालवतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अकोला : २० जानेवारी – पेट्रोल-डिझेल इंधनाने भरलेला टँकर शहरातील कारागृहासमोर उड्डाणपुलावर २०० फूट वर चढला आणि अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका आला. चालक बेशुद्ध झाल्याने टँकर अनियंत्रित होऊन वेगाने उताराच्या दिशेने आला आणि दुभाजकावर धडकला. ट्रकच्या मागे एकही वाहन नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. चालकाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माणिकराव रामराव महिंद्रे (वय ५५, रा. रविनगर, अमरावती) असे मृतक चालकाचे नाव आहे.
माणिकराव महिंद्रे हे टँकर घेऊन (क्र. एमएच २७ एक्स ५१३४) गायगाव येथे गेले. सहा हजार लिटर पेट्रोल व सहा हजार लिटर डिझेल या टँकरमध्ये भरून अमरावतीच्या दिशेने ते गुरुवारी दुपारी निघाले होते. अकोला शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलावरून दर्यापूर मार्गे ते अमरावती गाठणार होते. उड्डाणपुलावर टँकर चढत असताना २०० फूट वर गेला. त्याच वेळी अचानक माणिकराव महिंद्रे यांना हृयविकाराचा झटका आला. त्यामुळे टँकर अनियंत्रित होऊन वेगाने मागे घेऊन दुभाजकावर आदळला. टँकर पूर्ण इंधनाने भरला होता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ऑटोचालकांनी टँकर चालक यांना सर्वोपचार रुग्णालयात नेले. तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply