काँग्रेसची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये, संजय राऊत झाले सामील

श्रीनगर : २० जानेवारी – राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता काश्मीरमध्ये पोहोचली आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेदेखील राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले. ते काही अंतर राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत चालले. यावेळी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील जवळीक दिसून आली. राहुल गांधी यांच्या आजच्या पदयात्रेला सुरुवात झाली तेव्हा जम्मू परिसरात पाऊस पडत होता. त्यामुळे जवळपास अर्धा भारत फक्त एका टी-शर्टवर पालथ्या घालणाऱ्या राहुल गांधी यांना नाईलाजाने का होईना, अंगावर रेनकोट चढवावा लागला. यापूर्वी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी साध्या टी-शर्टवर वावरताना दिसले होते. या सगळ्याची चांगलीच चर्चाही रंगली होती. मात्र, आज राहुल गांधी यांना पावसामुळे रेनकोट अंगावर चढवावा लागला.
दरम्यान, संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, जम्मूमध्ये आज ५ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. अशातच पदयात्रेच्यावेळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. ते सुरुवातीला मला त्यांच्यात अंगातील रेनकोट काढून देत होते. मी नको नको म्हणत असतान त्यांनी गाडीतून दुसरा रेनकोटही मागवला. मात्र, मी पावसात चालायची तयारी दाखवली आणि आम्ही पुढे चालू लागलो. महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले. राहुल गांधी कडाक्याच्या थंडीत फक्त एका टी-शर्टवर फिरतात, याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना ओळखतो. मला त्यांची दिनचर्या माहिती आहे, मला त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता माहिती आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
राहुल गांधी हेदेखील मला अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या हृदयात सहा स्टेन्स असल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी चालू शकेन की नाही, याबाबत राहुल गांधी यांना शंका होती. परंतु, मी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला, असे संजय राऊत यांनी सांगितले.

आज सकाळी कठुआपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. यावेळी संजय राऊत गळ्यात भगवी मफलर घालून राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. मागचे चार महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी उत्तरेत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे.
काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून भाजपविरोधी आघाडी उभारण्याचा विचार चुकीचा आहे. अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव आणि केसीआर यांचा हा विचार योग्य नाही. काँग्रेस हा राष्ट्रव्यापी पक्ष आहे. देशभरातील लोक राहुल गांधी यांचे नेतृत्त्व स्वीकारताना दिसत आहेत. मी राहुल गांधी यांच्याकडे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) रिंगणात उतरेल, असेही सांगितले.

Leave a Reply