संपादकीय संवाद – नाना तुमची बुद्धी तर गटारात बुडली नाही ना?

गटार कामाचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, हे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असल्याची बातमी आज माध्यमांनी प्रसारित केली आहे. नानांचे हे विधान हास्यास्पद म्हणावे लागेल.
एखाद्याला कावीळ ही व्याधी झाली की त्याला सर्वकाही पिवळेच दिससु लागते, अश्या आशयाची एक मराठी म्हण आहे. नाना पटोले आणि सर्वच काँग्रेसजनांना कावीळ झाला असावा, अशी शंका घेण्यास निश्चित वाव आहे.. पंतप्रधानांच्या हस्ते आज सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांचा शिलान्यास सोहळा पार पडतो आहे. आमच्या माहितीप्रमाणे मुंबईत अशी ६ ठिकाणी शुद्धीकरण केंद्रे उभी राहणार आहेत. याला नाना गटारकाम म्हणत असतील, तर त्यांच्या बालबुद्धीची किव करावी लागेल.
आज सम्पूर्ण जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. परिणामी निसर्गाचा समतोलही बिघडतो आहे. याचाच परिणाम म्हणून की काय तर पावसाचे पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्याचबरोबर लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. आज पाण्यामुळे नळावर भांडणे होतात, आता सोबतच दोन राज्यांमध्येही भांडणे होत आहेत, अजून काही वर्षात देशादेशांमध्ये पाण्यासाठी युद्धही होईल. असे म्हणतात की तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठीच होणार आहे, त्यातील तथ्य नाकारता येत नाही.
अश्या परिस्थितीत पाण्याचा गैरवापर टाळायला हवा, त्याचबरोबर जलसाठेही वाढवायला हवेत. म्हणूनच सांडपाणी शुद्धीकरणाची संकल्पना पुढे आली. जगातील प्रगत देशांनी ती स्वीकारली आहे. भारतातही अनेक शहरांमध्ये असे प्रकल्प राबवले जात आहेत. नागपुरात नागपूर महापालिकेने भांडेवाडीनजीक असा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारला, शहरातील सर्व सांडपाणी आणि शौचालयातील घाण पाणी तेथे एकत्रित करून ते शुद्ध केले जाते, हे सर्व पाणी कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रांना विकले जाते, त्यातून नागपूर महापालिकेला नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कोरडी आणि खापरखेडा येथे आधी वापरले जाणारे पेंच नदीचे पाणी आता नागरी वस्त्यांसाठी वापरले जाते आहे.
हाच प्रयोग मुंबईतही होणार आहे. त्यासाठी ६ जलशुद्धीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. आतापर्यंत हे सर्व सांडपाणी समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे समुद्रातील पाणी दूषित होत होते. आता तो प्रकार थांबेल त्याचबरोबर या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी हे औद्योगिकरण आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाईल. परिणामी सध्या औद्योगिकरणासाठी वापरले जाणारे तानसा धरणातील पाणी आता पूर्णतः मुंबईकरांच्या उपयोगात येऊ शकेल.
सांडपाणी शुद्धीकरण केंद्राची ही संकल्पना सामान्य माणसाला देखील सहज समजू शकते, मात्र नानांसारख्या विधानसभेचा अध्यक्ष आणि एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या एका समजदार नेत्याला समजू नये हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. नानांना बाकी सर्व गोष्टी कळतात , त्यामुळे हेच नेमके कळले नाही असे होणे शक्य नाही, म्हणजेच समजून उमजून देखील नाना अकारण टीका करीत आहेत, जी फक्त राजकारण करण्यासाठी आहे, हे महाराष्ट्रातील शेम्बडे पोर सुद्धा सांगेल.
राजकारणात विरोधकांच्य चुका शोधून त्यावर टीका करणे यात काहीही वावगे नाही, ती सकस लोकशाहीची गरजच म्हणावी लागेल. मात्र कारण नसतांना ओढून ताणून अश्या प्रकारची टीका करणे आणि जनसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करणे हे गैरच म्हणावे लागेल.
अश्या प्रकारे आपण खोटेनाटे सांगून जनतेचा बुद्धिभेद करू शकू असे नानांना वाटत असेल तर तो त्यांचा बुद्धिभ्रमचं म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील जनता आता शहाणी झाली आहे. या नेत्याची अक्कलही गटारात बुडली की काय? अशी जनतेला शंका निश्चित येईल यायची जाण नानांनी ठेवावी, इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply