मिरचीच्या बागेत ठाण मांडून बसलेली वाघीण जेरबंद

भंडारा : १९ जानेवारी – भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील शेतशिवारात मिरचीच्या बागेत गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडलेल्या वाघिणीला अखेर वनविभागाने बुधवारी जेरबंद केले. नागरी वस्ती जवळ असल्याने प्रचंड गर्दीच्या साक्षीने पाच तास चाललेल्या या ‘जॉइंट रेस्क्यू ऑपरेशन’नंतर वाघिणीला पकडण्यात आले. यामुळे वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
मांडेसर येथील वालचंद दमाहे यांच्या शेतात या वाघिणीने दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. वाघिणीने मांडेसर-कान्हाळगांव रस्त्यालगत शेखर कस्तुरे यांच्या शेतात एका रानडुकराची शिकार केल्यानंतर परिसरात दहशत पसरली होती. बुधवार मांडेसर परिसरात ही वाघिण अनेकांना दिसून आल्याने परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
वाघिणीच्या ठिकाणापासून वन क्षेत्र जवळपास २० किमी अंतरावर असल्याने वाघिणीला जेरबंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. भंडारा वनविभागाचे कर्मचारी व आंधळंगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास ११ वाजतानंतर वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर सायंकाळी वाघिणीला बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देऊन यशस्वीरित्या जेरबंद केले.
पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर वाघिणीला तुमसर भागातील चिचोली लाकूड आगार येथे नेण्यात आले. यानंतर तिला मध्यरात्री उशिरा तिच्या अधिवासात सोडण्यात आले.

Leave a Reply