बोलीभाषा आणि म्हणी…- मधुसूदन (मदन) पुराणिक

आपल्या देशात प्रत्येक दहा-बारा कोसांवर बोलीभाषा बदलत जाते आणि त्या प्रत्येक बोलीभाषेतील विशेषता ही ती बोलीभाषा ज्या ढंगाने बोलली जाते त्यावर अवलंबून असते. बोलीभाषेतील बोलण्याच्या ढब आणि ढंगात इतकी लज्जत आणि गोडी असते की ती बोलीभाषा न येणारा सुद्धा त्या भाषेचा आस्वाद घेताना दिसून येतो.

बोलीभाषेचा एक महत्वाचा पैलू म्हणजे त्या बोलीभाषेतील शब्दसौदर्य आणि लहजा. बोलीभाषा शुद्ध की अशुद्ध असा विचारही त्या बोलीभाषेतील शब्द ऐकताना मनांत येत नाही आणि त्यांतील व्याकरणाच्या चुका शोधण्याचा कुणी भाषातज्ञाने प्रयत्न केला असेल असे मला तरी वाटत नाही. किंबहुना बोलीभाषेचा व्याकरणच नसते, ते प्रमाण भाषेला लागू होते. अरण्यातील पायवाट जशी लहरत लहरत जाते, त्या पायवाटेवर चालताना जसं पायाखालील पालपाचोळ्यांच्या संगीतमय बाज अनुभवायला मिळतो तसंच काही बोलीभाषेचं असतं. त्यामुळे बोलीभाषेचा अभ्यासकांनी बोलीभाषेतील सौंदर्यस्थळे शोधण्याचाच प्रयत्न केला असावा अशी माझी खात्री आहे.

ह्या बोलीभाषेतील सुरुवात कशी आणि कुठून झाली हा भाषातज्ञांच्या अभ्यासाचा विषय. परंतु माझ्या मते आजुबाजुच्या गावांतील, प्रांतातील, राज्यातील भाषांतील शब्दरचनांचा अपभ्रंशात्मक उपयोग करीत सहज वापरता येईल आणि ती आपल्या गावातील लोकांशी संवाद साधणारे योग्य माध्यम ठरल्याने ती बोलण्याच्या सरावाने ह्या हृदयीचे त्या हृदयी पोहचण्याचे महत्वाचे माध्यम झाले एवढे सामान्यतः म्हणता येईल. अर्थात भाषाशास्रातील तज्ञ व्यक्तींची मते ह्यापेक्षा वेगळीही असू शकतील कारण मी भाषाशास्त्राचा ना अभ्यासक आहे ना तज्ञ. एक सामान्य विचारांचा सामान्य व्यक्ती म्हणून माझ्या मनांतील ह्याबद्दलचे विचार मी येथे प्रस्तुत केले एवढेच.

ह्या प्रत्येक बोलीभाषांमधून अनेक शब्दरचना, अनेक वाक्यरचना जशा त्या भाषेला खुलवून जातात ना त्याचप्रमाणे त्या बोलीभाषेतील तयार केल्या गेलेल्या किंवा सहज तयार झालेल्या म्हणींनी त्या बोलीभाषांनाही समृद्ध केलेलं आहे.

प्रत्येक भाषेतील म्हणींनी त्या त्या भाषांना इतकं श्रीमंत करुन करुन टाकलं की त्या म्हणींमधून मिळणारे गर्भीत अर्थ त्या भाषिकांना सुविचारांची मेजवानीच देउन जातात. अर्थातच ह्या म्हणींनी त्या त्या भाषेला केवळ समृद्धच केलेलं नाही तर त्या भाषेचं सौंदर्य आणि नजाकतही वाढल्याचं लक्षात येतं. त्या सौंदर्याचा, नजाकतीचा आस्वाद ती भाषा बोलणारा, लिहीणारा आणि वाचणारा तर घेतच असतो परंतु ती भाषा ऐकणाराही तितक्याच मनसोक्तपणे घेत असतो.

माझ्या मते मराठी भाषा इतकी गोड, सुंदर, स्पष्ट आणि सौंदर्यवती आहे की तिची लज्जत आगळी वेगळीच. अर्थात इतर भारतीय भाषेतही वेगळेपण असावेच ह्यात शंका घेण्याचे कारणही नाही. परंतु मी मराठी आणि मराठी असे आमुची मायबोली, त्यामुळे त्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह असणे स्वाभाविकच नाही काय?

तर अशा या माय मराठीतील म्हणींतील गोडी आपल्यासोबत लेखांद्वारे चाखायला येत राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे, अर्थात ठराविक अंतराने. तोपर्यन्त…..वाट बघत राहू एकमेकांची.

मधुसूदन (मदन) पुराणिक

Leave a Reply