बंद दार – नंदकुमार वडेर

…” घ्या आता हे कुलुप घालून बंद केलेले दारं नीट बघून..
आणि हो मोजून घ्या बरं तुमचे पैसे आता त्याच्याकडून अगदी मुद्दल आणि व्याजासह..
दिला होताना तुम्हाला त्याने आजचा वायदा पंधरा दिवसापूर्वीच.. पेन्शनचे पैसे खात्यावर जमा झाले कि लगोलगच देतो, सारखं सारखं दारात येऊन तगादा लावू नका म्हणत होता कि.. हजारभर रुपयाला चुना लावून गेला म्हणायचा..
आता कुठं कुणा जवळ याची चौकशी करावी.. आणि हा बाबा कुणाला सांगून सवरून गेला असंल?
परत कधी येणार आहे ते पण काही कळणार नाही.. या दाराकडं बघून ते काय सांगणार आहे का?
.. ते आपल्या घरमालकासारखंच बथ्थड होऊन बंद उभं राहिलयं..
नाकात नथ अडकवावी तशी कडीकोंयडयात कुलुप घातलंय बघा..
‘ अगदी नथीचा मुरका मारुन, धनी गावाला गेल्याती हायित. दोन चार दिसांनी येतील. तवा तुम्ही माघारी येशीला.. तुमी आलत्याचं त्यांना मी बोलून ठूवते, ‘असं घरातली मालकिणीने सांगावं अगदी तसंच रूपडं धरलयं कि या दारानं.
.जरा दांगटपणा करून मनगट पिरगटून टाकावं तसा जरं कडीकोंयडा उचकटला तर दारं उघडलं कि.. करावं का तसं एकवेळ.
. पण नको कडीकोंयडा मोडून पडला तर दार बंद कसं राहिलं आणि उदयाला त्याला समजलं तरं घरं फोडलं महणून नसती आफत ती यायची.. तसं नको…
तो म्हातारा आल्यावरच परत त्याच्या दारात उभे राहूया..”
सावकार परत फिरला …आणि ते बंद असलेलं दारं आपल्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचं हासू दाबत मनात म्हणत होतं ,आता हे बंद असलेलं दार कधी उघडेल याचा भरवंसा नाही कारण मालक गेलेत अंगाला राख फासून काशी यात्रेला…स्वर्गाचं दार ठोठवायला.

नंदकुमार वडेर ,सांगली.

Leave a Reply