नितीन गडकरी यांना धमकीचा फोन कर्नाटकातील तुरुंगातून आल्याचा खुलासा

नागपूर : १५ जानेवारी – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. १०० कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणू अशीही धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. दरम्यान, ही धमकी कर्नाटकमधील एका तुरुंगातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. धमकी देणाऱ्या तुरुंगातील व्यक्तीचे नाव जयेश कांता असे आहे.
याबाबत नागपूर पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तरुंगातून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जयेश कांता असे आहे. हा आरोपी कुख्यात गुंड असून त्याच्यावर खुनाचा आरोप आहे,” अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात शनिवारी (१४ जानेवारी) धमकीचे फोन कॉल्स आले होते. दाऊद इब्राहीम टोळीचा सदस्य असून १०० कोटी रुपये द्या अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी या फोनद्वारे देण्यात आली होती. एकूण तीन निनावी फोन कॉल्सनंतर गडकरी यांचे निवासस्थान तसेच कार्यालयावरील सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत कॉल ट्रेस केला होता. हा फोन कॉल बेळगामधून आला होता, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथकही कर्नाटकमध्ये रवाना झाले होते.

Leave a Reply