क्षुल्लक कारणातून पतीने केला पत्नीचा खून

बुलढाणा : ९ डिसेंबर – बुलढाणा तालुक्यातील नांद्राकोळी हे गाव आज संध्याकाळी झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने चांगलेच हादरले. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नांद्राकोळी येथील गणेश भागाजी जाधव (४५) व सुनीता गणेश जाधव (३७) या पती-पत्नीत गुरुवारी किरकोळ वाद झाला. वादानंतर गणेश घराबाहेर पडला. यामुळे हा वाद मिटल्यासारखा वाटत असतानाच गणेश संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास घरी परतला आणि शिलाई मशीनवर काम करीत असलेल्या सुनीतावर त्याने वखराच्या अतिधारदार पासने वार केले. त्यातील वार गळ्यावर लागल्याने तिचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र देशमुख, बिट जमादार परमेश्वर राजपूत सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृताचा पुत्र विशाल जाधव याने घटनेची फिर्याद दिली.
एखादी घटना किती वेगळी, दूरगामी परिणाम करणारी असते हे या घटनेने सिद्ध झाले. एका इसमाने क्षुल्लक कारणावरून आपल्या पत्नीची हत्या केली, त्याच्या विरुद्ध मुलाने तक्रार दिली, आता तो कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. काही क्षणातच पुत्राने आई गमावली, बाप गजाआड झाला, असा भीषण अनुभव दुर्दैवी पुत्राच्या नशिबी आला आहे.

Leave a Reply