अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बाळाला जन्म दिल्यावर प्रियकराचा लग्नाला नकार

नागपूर : १० जुलै – नागपूर शहरातील वाडी पोलिस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना पुढे आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने पीडितेसोबत वारंवार शारीरिक सबंध प्रस्थापित केल्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर आरोपी प्रियकराने तिला लग्नास नकार दिला. याव्यतिरिक्त आरोपीने पीडितेच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल रोहिदास ससाने (वय २४) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, १७ पीडिता आणि आरोपी हे एकाच परिसरात वास्तव्याला आहे. आरोपी अमोल ससाने हा कॅटरिंगचा व्यवसाय करतो. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पीडितेच्या घराशेजारी एक लग्नसोहळा पार पडला. या लग्नाच्या कॅटरिंगचे काम आरोपीला मिळाले होते. याच सोहळ्यात आरोपी आणि पीडितेची भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यात बोलचाल सुरू झाली. हळूहळू मैत्रीत बदललेले सबंध प्रेमात रूपांतरित झाले. त्यानंतर आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेलाही आरोपी तिच्याशी लग्न करेल, असा विश्वास वाटला. त्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार शरीर संबंध ठेवले. त्यातून पीडितेला गर्भधारणा झाली. पीडितेला ती गर्भवती असल्याचे कळल्यानंतर तिने आरोपी अमोलला लग्नासंदर्भात विचारणा केली. यावेळी आरोपीने आपल्या संबंधाबद्दल कुणाला काहीही सांगितले तर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या धमकीला घाबरलेल्या पीडितेने कुणालाही काहीही सांगितले नाही. सात महिने ती चूप होती. परंतु, ७ जुलै रोजी पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून पीडिता ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकून पीडितेच्या आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी बाळंतपण होऊ दिले. पीडितेने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध वाडी पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

Leave a Reply