संपादकीय संवाद – पंतप्रधानांच्या भाषणातील मर्म देशातील जनता समजून घेईल

काल लोकसभेत आणि आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. विविध मुद्दे घेत त्यांनी काँग्रेसला अक्षरशः झोडपून काढले, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करा असे सुचवले होते, याकडे लक्ष वेधून त्यावेळी काँग्रेस विसर्जित झाली असती, तर बऱ्याच वाईट घटना टाळता आल्या असत्या असा दावाही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसवर त्यांनी सर्वात मोठा आरोप त्यांनी केला तो घराणेशाहीचा, हा आरोप कुणालाच नाकारता येत नाही. नेहरू घराण्याला देशाची सत्ता कायम आपल्याकडे राहायला हवी होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्ष आपल्या दावणीला बांधला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर पंडित नेहरूंना देशाची सत्ता हवी होती, त्याचवेळी बॅरिस्टर जिनांना देखील देशाचे प्रमुख व्हायचे होते, या दोघांच्या भांडणात देशाचे विभाजन केले गेले आणि हिंदुस्थान आणि पाकिस्तान असे दोन देश झाले, असा आरोप केला जातो. त्यानंतर १७ वर्ष जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान राहिले, त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांना पंतप्रधान व्हायचे होते. मात्र इंदिरा गांधी वडील गेल्याच्या दुःखात असतानाच काँग्रेस पक्षाने लाल बहादूर शास्त्रींना पंतप्रधान म्हणून निवडले आणि त्यांचा शपथविधी केला. त्यावेळी नेहरू परिवारातील सदस्यांनी कसे आकांडतांडव केले होते, याचे वर्णन ज्येष्ठ पत्रकार मो. ग. तपस्वी यांनी आपल्या नियतीचा करार या पुस्तकात सविस्तर केले आहे. योगायोगाने दीड वर्षातच शाश्त्रीजींचे निधन झाले, आणि त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. इंदिराजींनंतर राजीव गांधींना पंतप्रधान केले गेले. राजीवजींनंतरही सोनियांना पंतप्रधान व्हायचे होते, मात्र ते होऊ शकले नाही. आजही राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे आहे, शक्य झाले तर काँग्रेस पक्ष त्यांना किंवा त्यांची बहीण प्रियांका गांधी यांना पंतप्रधान करेलही, ही घराणेशाही नाही काय? काँग्रेस पक्षात अन्य कुणीही लायक नव्हते काय? १९४७ सालीही पंतप्रधान पदासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव पुढे आले होते, मात्र नेहरूंच्या आग्रहाखातर महात्मा गांधींनी पटेलांना बाजूला सारत नेहरूंना पंतप्रधान केले असे इतिहास सांगतो.
या घराणेशाहीमुळेच काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे नुकसान झाले आहे. इंदिरा गांधींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी देशात आणीबाणी आणली होती. आणखीही कितीतरी बेकायदेशीर गोष्टी या काळात घडल्या होत्या. त्याचे परिणाम देशाला आजही भोगावे लागत आहेत.
म्हणूनच मोदींनी आज काँग्रेसवर खुलेआम टीकास्त्र सोडले आहे. मात्र काँग्रेस समर्थक यासाठी मोदींना टीकेचे लक्ष्य करू बघत आहेत. अर्थात देशातील जनता आता शहाणी झाली आहे. मोदींच्या या दोन्ही भाषणांचे मर्म या देशातील जनता समजून घेईल हा आम्हाला विश्वास आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply