वर्धेत पोलीस वसाहतीत होमगार्ड तरुणीने स्वतःला पेटवून घेतले, चर्चांना उधाण

वर्धा : १० जानेवारी – वर्धेच्या पिंपरी मेघे येथील पोलीस वसाहतीत रविवारी रात्रीच्या सुमारास एका होमगार्ड तरुणीने अंगावर पेट्रोल घेत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणी गंभीररित्या भाजल्याने तिला नागपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
तरुणीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर स्वतःला पेटवल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार वर्धेच्या आदिवासी कॉलनी परिसरात रहाणाऱ्या ३६ वर्षीय अंजली मैंद असं जखमी तरुणीच नाव आहे. पिंपरी मेघे येथील पोलीस वसाहतीतील शरद या बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरील एफ-२ क्रमांकाच्या घरासमोर या तरुणीने स्वतःला पेटवून घेतले.
तरुणीने स्वतःला पेटविल्याची बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच तिला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत तरुणी ही ७० ते ८० टक्के भाजली असल्याची माहिती असून तिला नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप कळू शकले नसून चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply