मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला भीषण आग

मुंबई : १० जानेवारी – मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला विमानाजवळ आग लागली. हे विमान प्रवाशांनी खचाखच भरले होते. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या आगीमुळे विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडियाचे हे विमान मुंबईहून जामनगरला जात होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, विमान प्रवाशांनी भरलं होतं. एअर इंडियाच्या AIC-647 विमानाजवळ हा अपघात झाला. विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. एअर इंडियाच्या या विमानात 85 प्रवासी बसले होते. पुशबॅक ट्रॅक्टरला आग लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रॉली ओढणाऱ्या ट्रॅक्टरला आग कशी लागली, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आग लागली तेव्हा ही ट्रॉली विमानाच्या अगदी जवळ होती. सुदैवाने आग विमानापर्यंत पोहोचली नाही. आग विमानापर्यंत पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. ट्रॅक्टरला ही आग कशी लागली याचा तपास सध्या सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply