मी ४० वर्ष तुमच्यासोबत होतो तर चांगला होतो, आता एका वर्षात ईडी मागे लावली – एकनाथ खडसे

जळगाव : १० जानेवारी – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपावर टीका केली आहे. “मी ४० वर्ष तुमच्यासोबत होतो तर चांगला होतो आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर एका वर्षात ईडी मागे लावली,” असं म्हणत त्यांनी भाजपाला सुनावलं. ते जळगावातील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
“या पक्षाच्या विस्तारासाठी मी गावपातळीवर प्रयत्न केले, मेहनत केली आणि अनेक लोक घडवले. पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनं मोठे झाले. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. या ठिकाणी मेहनतीनं कष्टानं माणसं उभं केली आणि घडवली. ४० वर्ष रक्ताचं पाणी करत पक्षासाठी फिरत होते. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावोगावी पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली,” अशी आठवण त्यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितली.
पुढे ते म्हणाले, “अलीकडचे राजकारण कशाप्रकारे चालते हे तुम्ही पाहत आहात. कोणाच्या मागे कशा ईडीच्या चौकशा लावल्या जाता ते देखील तुम्ही पाहताय. ४० वर्ष तुमच्या पक्षात होतो, तुमच्या सोबत होतो, तर मी चांगला होतो. एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की मागं ईडी लावता. तारीख पे तारीख सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले आणि आता त्याचा अपमान करता. त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील, जनता तुम्हाला येणाऱ्या काळात माफ करणार नाही,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

Leave a Reply