बकुळीची फुलं : भाग -४ – शुभांगी भडभडे

माझी बेजबाबदार पणे कापूस फेकून देण्याची गोष्ट आईला कधीतरी कळली होती . पण ती बोलली नाही. क्षमा हाच तिचा गुणधर्म होता .तिला अतीच राग आला तर म्हणायची.
“ऐकायचं नाही ना तुला, आज मी जेवणार नाही “
समजावून सांगणं हाच तिचा मूळ स्वभाव होता .
मी चौथीत गेले होते. आणि त्यावेळी आई प्रभात फेरी ,पिकेटींग , निषेधाची घोषणा पत्र वाटणं असं सारं करत होती. आम्हाला सांभाळत होती . आणि नोकरीही करत होती .
त्यावेळी आमच्याकडे “केसरी” पेपर यायचा त्यात जवाहरलाल नेहरू , महात्मा गांधी , कधी सुभाषचंद्र बोस असे बरेच फोटो यायचे
आई मला केसरी पेपरातल्या दहा ओळी शुद्धलेखन लिहायला सांगायची. मीही पेपर घेऊन दहा ओळी लिहायची . त्यितून बातम्या मला कळत होत्या आणि फोटोही मला दिसत होते. मी हातातल्यि पेन्सिली ने कोणाला चष्मा लावायची , कोणाला दाढी मिशा .
बरेच दिवस आईला दिसलं नसावं . एक दिवस ते माझे उपद् व्याप दिसले .एरवी कोणतीही देशभक्त आई रागावली असती , पाठीत धपाटे घातले असते .
तिने पेपर घेतला
महात्मा गांधींना मी दाढी मिशा आणि चष्मा ही रंगवून घातला होता आणि त्यांच्या छातीवर स्वस्तिक काढलं होतं.
आई म्हणाली ” अगं तुला आजोबा नाहीत असं मी म्हणाले होते ना. हे महात्मा गांधी राष्ट्रा चे पिता म्हणजे वडील आहेत . तुझ्या वडीलांचे वडील म्हणजे तुझे आजोबा. त्यांना असं रंगवायचं का ? तुझ्या दादांना असं कुणी रंगवलं तर चालेल तुला ?”
मला रडू कोसळलं पण मला त्यावेळी हे कळलं नाही की गांधी आडनाव आजोबांचं कसं असेल . माझं तर फडणवीस आहे . त्यावेळी अक्कल कमीच असावी . आजच्या चार वर्षांच्या चुणचुणीत मुली पाहिल्या की माझीच मला लाज वाटते .
पण त्यानंतर मी महात्मा गांधींचे फोटो पेपरातून कापून माझ्या वहीत जपून ठेऊ लागले. आणि माझे आजोबा मला मनातून आवडू लागले.
त्यावेळी स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग आला होता . आमच्या शाळेत अनेक नेते मंडळी येत होती . जोशपूर्ण भाषणं देत होती. “स्वातंत्र्य” शब्द सतत क वावर पडत होता , खुप काही कळत नव्हतं . पण खुप काही करावसं वाटतं होतं . भारत देश प्रत्यक्ष दिसत नव्हता . त्याचं स्वरूप कळत नव्हतं . पण “स्वतंत्र भारत” ह्या कल्पनेनी भारावलो होतो .
त्यादिवशी साने गुरुजी शाळेत येणार होते . त्यांची श्यामची आई मनात घर करून होती . तरीही आईला विचारलं
“हेच का ग ते? . मला देवी आल्या तेव्हा सांगितली होतीस ना कथा ? ह्यांचं नाव श्याम आहे का?
“हो तेच हे . पण त्यांचं नाव पांडुरंग सदाशिव साने. आज ते भाषण द्यायला येणार आहेत.”
त्यांचं नाव ऐकून अनेक माणसं आलीत. शाळेचं भव्य पूर्ण पटांगण भरलं.साने गुरुजी मला बघायची कमालीची उत्सुकता होती .
मी पटांगणात पहिल्या रांगेत जमिनीवर बसले . पाच पन्नासच खूर्च्या होत्या. बाकी सारेच जमिनीवर बसले होते . ते आले . उंची फार नव्हती . रंगही सावळा होता . तरी ते मला आवडले .
त्यांची बोलायची वेळ आली आणि लक्षात आला तो त्यांचा आवाज .भारताच्या पारतंत्र्यात आपण कसे जगतो आहोत हे सांगता सांगता ते गहिवरले . शेवटी तर इतकं अधिक त्यांना गहिवरून आलं की ते काही वेळ थांबले.
आज वाटतं ” मृत्यूचं काव्य” “श्यामची आई” आणि एकूण १४६ पुस्तकं लिहीणारे हे कोमल मनाचे लेखक कवी मला ऐकायला मिळाले , पहायला मिळाले , पण पुढे ह्या संवेदनाशील लेखकाने आत्महत्या केली . आत्महत्येचा क्षण त्यांना जिंकता आला नाही . असं अतीव दुःख त्यांना कोणतं झालं असेल ? देश तर स्वतंत्र झाला होता .
आजही मनात हा विचार येतोच.
त्यावेळी हे नव्हतं कळलं .
एक दिवस आई म्हणाली ” तुझे आजोबा , राष्ट्रपिता महात्माजी , दादर चौपाटीवर येणार आहेत . त्यांना भेटण्याची मला संधी आहे आणि तुलाही . तू स्वतः टकळीवर सूत काढून त्याचा हार कर.
मला कमालीचा आनंद झाला. नविन परकर पोलकं आईनी शिवलं .त्यांना काय काय द्यायचं हे मी पिशवीत जमवून ठेवलं. त.यात वहीत जपून ठेवलेलं मोरपीस होतं, माझं आवडतं .
पण ते आलेच नाहीत . ३० जानेवारी १९४८ ला वध झाला होता .
मला माझे आजोबा भेटलेच नाहीत , ना आईचे वडील ना माझ्या दादांचे
वडील ना राष्ट्रपिता .
कितीतरी दिवस मी तो सूताचा केलेला हार पिशवीत ठेवलेला होता
आता ती पिशवी नाही , हार नाही , पण आहेत आठवणी .
त्याच आठवणी देऊन टाकणार आहे सर्वांना . उतरत्या संध्याकाळी रिकामं असलेलं बरं , खरं ना ?

शुभांगी भडभडे

Leave a Reply