नागपूर रेल्वे स्थानकावर सोन्याच्या बिस्किटांसह लष्कराच्या जवानाला अटक

नागपूर : १० जानेवारी – सोन्याच्या बिस्किटांसह संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या लष्कराच्या जवानाला आरपीएफने अटक केली. त्याच्याजवळील बॅगमधून ५ लाख रुपयांचे सोने तसेच २ लाख ६३ हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेला जवान मूळ अमरावती येथील असून, सध्या तो विशाखापट्टणम येथे कार्यरत आहे.
नागपूरमार्गे सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफला मिळाली होती. त्याआधारे, २०८०५ विशाखापट्टणम-नवी दिल्ली ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येताच आरपीएफच्या पथकाने तपासणी सुरू केली. या गाडीच्या एच-१ कोचजवळ लाल रंगाची ट्रॉली बॅग घेतलेला एक व्यक्ती आढळून आला. पथकाने त्याची विचारपूस केली असता आपण लष्करात जवान असल्याचे त्याने सांगितले. बॅगमध्ये काय आहे, याबद्दल त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्याला ठाण्यात आणण्यात आले. तेथील चौकशीत बॅगमध्ये २ लाख ६३ हजार रुपये रोख व ५ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे असल्याची माहिती त्याने दिली. या सोन्या संबंधात त्याच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती तसेच ती कुठून आणली याबाबतही तो बरोबर उत्तर देत नव्हता. शेवटी त्याला अधिक चौकशीसाठी केंद्रीय अबकारी विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई आरपीएफचे आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात, निरीक्षक आर. एल. मीना यांच्या नेतृत्वात सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, कॉन्स्टेबल नवीनकुमार, मुनेश गौतम, अजय सिंह यांनी केली.

Leave a Reply