धर्म संसदेतील द्वेषयुक्त भाषण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नवी दिल्ली : १० जानेवारी – हरिद्वार आणि रायपूरमधील धर्म संसद काही दिवसांपूर्वी द्वेषपूर्ण भाषणांमुळे चांगलीच चर्चेत होती. या धर्म संसदेतील द्वेषयुक्त भाषण प्रकरणावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे वादग्रस्त हिंदुत्व नेते यती नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक मेळाव्यात मुस्लिम विरोधी विधाने करण्यात आली होती.
वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की धर्म संसद द्वेषयुक्त भाषणाचा मुद्दा अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवला गेला आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई किंवा अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती करतो,” असं ते म्हणाले.
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर या तीन दिवसीय धर्म संसदेत अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिक भाषणे करण्यात आली. या मेळाव्याला संबोधित करणाऱ्या अनेक हिंदू धर्मगुरूंनी समाजाला शस्त्रे उचलण्याचे आवाहन केले. मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी ‘हिंदू राष्ट्रा’ची घोषणा केली.

Leave a Reply