तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने वडिलांनाच लावला ७ लाखांचा चुना

नागपूर : १० जानेवारी – नागपुरातील बोरखेडी येथील एका तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या आजारी वडिलांना लाखोंचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. आरोपी मुलीने बनावट स्वाक्षरीच्या मदतीने आपल्या वडिलांचं बँक खातं रिकामं केलं आहे. तिने वडिलांच्या बँक खात्यातील ७ लाख रुपयांची रक्कम स्वत:सह शेजाऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली आहे. रुग्णालयातून वडिलांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर, त्यांनी आपलं बँक खातं तपासलं असता हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी मुलीसह शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास बुटीबोरी पोलीस करत आहेत.
सिद्धार्थ रामदास गोंडाने असं ६२ वर्षीय फिर्यादीचं नाव असून ते बोरखेडी येथील रहिवासी आहेत. फिर्यादी गोंडाने हे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी वगैरे मिळून त्यांना २२ लाख रुपये मिळाले होते. यातील पंधरा लाखांची त्यांनी एफडी केली होती. तर बाकीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले होते. दरम्यान, एप्रिल २०२१ मध्ये त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत ते रुग्णालयातच उपचार घेत होते.
या काळात त्याचं बँकेचं पासबूक आणि इतर कागदपत्रे घरीच होती. याच कागदपत्राच्या सहाय्याने फिर्यादीची आरोपी मुलगी शशिकला हिने शेजारी टोनी थॉमस जोसेफ आणि त्याची पत्नी मोनिका थॉमस जोसेफ यांच्या मदतीने सात लाख रुपये आपल्या खात्यात वळते केले आहेत. फिर्यादी गोंडाने रुग्णालयातून घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी बँकेत जाऊन खात्यावरील रक्कम तपासली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. यावेळी त्यांच्या खात्यात केवळ २७ हजार रुपये शिल्लक होते.
आरोपी मुलीने सात लाख रुपयांचं नेमकं केलं काय? आणि तिने शेजाऱ्यांच्या खात्यात पैसे टान्सफर कशासाठी केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच एवढी मोठी रक्कम काढत असताना, बँकेला याबाबत संशय कसा आला नाही? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी गोंडाने यांनी बुटीबोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply