जम्मू – काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याची नागपूर पोलिसांकडून कसून चौकशी

नागपूर : १० जानेवारी – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला रईस अहमद शेख असादउल्ला शेख (वय २८ रा. अवंतीपुरा, जम्मू काश्मीर) याच्या नागपुरातील ‘नेटवर्क’चा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे. नागपुरात आल्यानंतर रईसला कोण मदत करणार होते, त्याला कोणत्या प्रकारची साधणे उपलब्ध करून देण्यात येणार होती, यासह त्याच्या वास्तव्यापासून ते परत जाण्यापर्यंतचा ‘मिनिट टू मिनिट’ तपास पोलिस करीत आहेत.
जम्मू काश्मीर पोलिसांनी रईसला अटक केल्यानंतर रेशीमबागेतील स्मृती मंदिराचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचे उघड झाले. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. याची माहिती मिळताच गुन्हेशाखा व दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तत्काळ काश्मीरला गेले. संबंधित पोलिस व रईसकडून माहिती घेत पथक नागपुरात परतले. गुन्हेशाखा पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तपासाला वेग दिला. रईस याला विमानतळावरून सीताबर्डीतील हॉटेलपर्यंत आणणाऱ्या ऑटोचालकाचाही पोलिस शोध घेत आहेत. यासह त्याला एका धर्मगुरूने ताबीज दिले. हा धर्मगुरू त्याला ओळखतो का? त्याने नेमके कशासाठी त्याला ताबीज दिले. या ताबीजमध्ये एखादा संदेश पाकव्याप्त काश्मिरातील लाँचिंगपॅड ऑपरेशनल कमांडर ओमर याला पोहोचविण्यात येणार होता का? या सर्व बाबींचा छडा पोलिस लावणार आहेत. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित चार ते पाच जणांची पोलिसांनी कसून चौकशी केली असून, यात हॉटेलचा व्यवस्थापक व नोकराचाही समावेश असल्याची माहिती आहे.
संवेदनशील ठिकाणांपैकी एक रेशीमबागेतील स्मृती मंदिराचे गुप्तपणे चित्रीकरण करण्यात आल्याचा सुगावा पोलिसांना दोन महिन्यांपूर्वीच लागला होता. या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी साध्या गणवेशात स्मृती मंदिर व महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत येथील सुरक्षेत वाढ केली होती. अमितेशकुमार यांच्यासह पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्या नेतृत्वातील पथकानेही या दोन्ही स्थळांना भेट दिली होती.

Leave a Reply