गोव्यात भाजपला झटका, मंत्री मायकल लोबो यांनी दिला राजीनामा

पणजी : १० जानेवारी – गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकारण तापू लागलं आहे. गोव्या सध्या भाजपची सत्ता आहे आणि यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी इतर पक्षांसह सत्ताधीर भाजपनेही तयारी केली आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपला मोठा झटका बसला आहे. मायकल लोबो यांनी मंत्रीपदाच्या राजीनाम्याचा बॉम्ब फोडत भाजपला धक्का दिला आहे. लोबो यांनी भाजपचाही राजीनामा दिला असून ते आज संध्याकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपचा राजीनामा देणारे मायकल लोबो गोव्यातील पहिले मंत्री आणि तिसरे आमदार आहेत. यामुळे गोवा विधानसभेत भाजप आमदारांची संख्या कमी होऊन २४ इतकी झाली आहे.
मी गोव्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कलंगुट विधानसभा मतदारसंघातील नागरिक आपल्या आपल्या या राजीनाम्याच्या निर्णयाचे स्वागत करतील, अशी अपेक्षा आहे. फक्त मंत्रीपदाचाच नाही तर भाजपच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. पुढचं पाऊल काय असेल? यावर विचार सुरू आहे. मी इतर पक्षांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. ज्या दृष्टीकोनातून आमच्याकडे आणि पक्ष कार्यकर्त्यांकडे बघितलं गेलं. त्यावर आम्ही नाराज आहोत, असं मायकल लोबो यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं.
गोव्याच्या मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. आता गोवा भाजपमध्ये मनोहर पर्रिकर यांचा वारसा चालवण्यासारखे काहीही उरलेले नाही. ज्यांनी पर्रिकर यांना समर्थन आणि पाठिंबा दिला त्या कार्यकर्त्यांना हटवले जात आहे, असे मायकल लोबो म्हणाले. पण मनोहर पर्रिकर असते तर आपण राजीनामा दिला नसता, असे लोबो यांनी स्पष्ट केले.
मायकल लोबो हे गोव्यातील कलंगुट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार होते. दिवंगत मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते मनोहर पर्रिकर यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. राजीनामा देणार असल्याचीही चर्चा जोरात होती. भाजपने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज होते, असं बोललं जातंय. लोबो हे गेल्या १५ वर्षांपासून भाजपसोबत होते.

Leave a Reply