काँग्रेस गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाला तयार नाही – संजय राऊत

मुंबई : १० जानेवारी – शनिवारी पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेलं महाविकासआघाडी सरकार गोव्यातही मआविचा प्रयोग कायम ठेवणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेना इथेही एकत्र येत निवडूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असले तरी काँग्रेस मात्र त्यांच्यासोबत नसणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. यावर आता संजय राऊत यांनी माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
गोव्यातील निवडणुकांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, की गोव्यातही महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. मात्र, गोव्यामध्ये आपण स्वबळावर सत्ता आणू शकतो, असं काँग्रेसला वाटत असल्याने कदाचित ते महाविकास आघाडीच्या प्रयोगाला तयार नसावे.
काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आमच्यासोबत आहे. त्यामुळे या प्रकरणात आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत. परंतु शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेनं दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, की विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त करण्यासाठी शिवसेनेला पैसे मिळतात. याच कारणामुळे शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणूक लढवत आहे.

Leave a Reply