आधी सोशल मीडियावर प्रेम, मग आक्षेपार्ह व्हिडीओ मिळवत केले तरुणीला ब्लॅकमेल

नागपूर : १० जानेवारी – अलीकडे सोशल मीडियाचे चलन वाढले असून, या माध्यमातून गुन्हेगारीच्या घटनादेखील वाढीस लागल्या आहेत. या प्रकरणातील अनेक गुन्हे पुढे येत आहे. अशीच एक घटना मानकापूर पोलिस ठाणे हद्दीत घडली. स्नॅप चॅटवर एका मुलाशी आधी मैत्री नंतर प्रेम झाले. ते एवढे पारावर चढले की तरुणीने भान विसरून तिचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ त्याला पाठवले. आता मात्र, या तरुणाकडून तिची ब्लॅकमेलिंग केली जात असून, त्याने तिचे काही व्हिडीओ तरुणीच्या नातलगांना पाठविल्यानंतर हा प्रकार पुढे आला.
रितिक मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. तर पीडिता (वय १७) ही बाराव्या वर्गात आहे. या तरुणीने रितिक कोण आहे, कुठला आहे, याबाबत कुठलीही चौकशी न करता त्याच्याशी स्नॅप चॅटच्या माध्यमातून आधी मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या घट्ट प्रेमाचे संबंध तयार झाले. मागच्या वर्षी त्यांची एकमेकांची स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. प्रेमात पडल्यानंतर ते दोघेही एकमेकांशी संपर्कात राहत होते. या दरम्यान, आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ मिळविले. तरुणीचे असले व्हिडीओ त्याच्या हातात लागल्यानंतर त्याची मागणी सातत्याने वाढू लागली. परिणामी, पीडित तरुणीने त्याच्यासोबत दुरावा करीत बोलणेही टाळू लागली. तिचे असे वर्तन बघून आरोपी रितिक हा तिला ब्लॅकमेल करू लागला. रितिकचे असले प्रकार बघता तिने त्याच्यासोबत बोलणे पूर्णत: बंद करून टाकले. तरुणी आपल्याशी बोलत नाही म्हणून रितिकने तिच्या मोबाईलमधील संपर्कात असलेले सर्व नंबर काढून त्यातील एका जवळच्या व्यक्तीला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले. एवढय़ातच तो थांबला नाही तर त्याने त्या संबंधित व्यक्तीला फोन केला आणि तिला बोलायला लावा अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी याबाबत तिला विचारले आणि तिच्या आई-वडिलांनाही सबब प्रकार टाकला. सर्व प्रकार पुढे आल्यानंतर पीडितेने रितिकच्या विरोधात मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास हाती घेतला आहे.

Leave a Reply