सरकारने कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये – चंद्रकांत पाटील

मुंबई : ९ जानेवारी – रात्रीचे उद्योग करणाऱ्यांवर तुम्ही निर्बंध आणताय, आणायचेच असतील तर दिवसा चालणाऱ्या उद्योगांवरही आणा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकराने नवीन निर्बंध घोषीत केल्यानंतर दिलीय. “परंतु आता जास्त निर्बंध आणून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये,” असं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.
“राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी, राज्यात केवळ पाच पक्ष आहेत, पण तसं होतं नाहीये. विरोधी पक्षांना विचारात घ्यायचं नसतं. राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय, असं म्हणत पाटलांनी सरकारवर टीका केली. किमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तरी बैठकीत बोलवायचं, ते शासकीयदृष्ट्या शासनाचा भाग आहेत,” असं पाटील टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.
“सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरू करतात, कधी बंद करतात, कधी परीक्षा ऑनलाइन तर कधी ऑफलाइन. राज्य सरकारकडून सत्यानाश चालला आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला सुनावले. सर्वजण बसून एकमत करून नियमावली जाहीर करा, वडेट्टीवार चंद्रपुरात वेगळं बोलणार, टोपे जालन्यात वेगळं बोलणार, अजित पवार वेगळंच बोलणार. रोज नवीन घोषणा करण्यापेक्षा एकच काय ते ठरवा, लोकांना घाबरवू नका, तज्ज्ञांना विचारा त्यांना बोलू द्या, हे सरकार गेंड्यापेक्षाही जास्त असंवेदनशील झालंय,” असं पाटील म्हणाले.
जे मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षात करोना काळात मैदानात उतरले नाहीत, ते आता तर त्यांची तब्येत बरी नसल्याने का येतील, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Leave a Reply