सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

चहापेक्षा किटल्या गरम

एका भाषणामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक विधान केले होते,”चहापेक्षा किटल्या गरम.” त्यांच्या सांगण्याचा भावार्थ होता की राजकारणी लोकांच्या वलयात असणारे लोकं स्वतः ला, राजकारणी लोकांच्या वर आहोत असे समजून सामान्य जनतेची भुलावण करीत असतात. म्हणजे “चहापेक्षा किटल्या गरम”.
पुस्तक छापण्याचा मानस आहे. “सडेतोड” विचार तसे “सडेतोड” लिखाण. राजकीय सडेतोड विश्लेषण केलेले. काही निरनिराळ्या पंथाचे आलेले अनुभव, आपल्या कामाचे अनुभव जसेच्या तसे मांडलेले. “राष्ट्रभक्ती” ह्या मिळालेल्या बाळकडू तून अनुभवलेले अनुभव, आपल्या पारदर्शी चष्म्यातून मांडले आणि “सडेतोड” पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस जन्माला आला. हे लिखाण “पंचनामा” ह्या दैनिकात प्रसिद्ध होत असते.
गंमत अशी की ह्या लिखाणाची प्रस्तावना घेण्यासाठी नागपूरातील बऱ्याच मान्यवर लेखकांनी १५-२० दिवसांचा वेळ खाल्ला आणि नंतर पुस्तकातील सडेतोड लिखाण वाचून नंतर लिखाणाला प्रस्तावना देण्यास टाळाटाळ केली. राजकीय सडेतोड लेख, पंथांवरील सडेतोड मुद्दे ह्या दोन गोष्टींमुळे कोण पंगा घ्या जगाशी ही वृत्ती. त्यामुळे सगळ्यांनी प्रस्तावना देण्यास टाळले. कोणी दुसऱ्या लेखकाला विचारा सांगितले तर कोणी नंतर फोन करून तुम्हाला बोलावतो म्हणून सांगितले. त्यांचा आजपर्यंत फोन आला नाही.
माझ्या एका मित्राने मला सुचवले तू देवेंद्र फडणवीसांना का विचारत नाही? देवेंद्र फडणवीसांना बदल मला देखील खुप आदर. त्यांचे वागणे, त्यांचे अभ्यासपूर्ण वक्तव्य. त्यांची शुद्ध वाणी, चपखल शब्दयोजना आणि त्यायोगे धारेवर धरलेले सत्ताधारी पक्षाचे दणाणलेले सत्ताधारी पक्षाचे धाबे. अमिताभ बच्चन ला जर “देवेंद्र फडणवीस” यांच्या साठी शब्दयोजना करण्यास सांगितले असते तर अमिताभ बच्चन ला केवळ, हमारे “अद्भूत” माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी” एवढाच् शब्दप्रयोग आठवला असता.
तर मित्राचे म्हणणे शिरसावंद्य मानून मी त्रिकोणी मैदानापाशी त्यांचे ऑफिसला गेलो. ऑफिसच्या द्वारावर द्वारपाल आस्थेनी तुमची चौकशी करणार, कामानुरूप कोणाला भेटायचे ते सांगणार. आत जायच्या आधी तुमचे नाव नोंदवले जाणार, तुमचा फोन नंबर नोंदवला जाणार आणि कोणाला भेटायचे आहे त्याचे नाव नोंदवले जाणार. मग तुमचा आत जायचा मार्ग प्रशस्त. मला त्यांनी श्री अंकित ह्यांना भेटायला सांगितले.
“अंकित” निरागस चेहऱ्याचा धनी. ह्याच्याकडे बघितल्यानंतर माननीय देवेंद्र साहेबांचा निरागस चेहरा आठवतो. पुर्वपिठीका माहित नसणाऱ्यांना जर हा माजी मुख्यमंत्र्यांचा चेहरा दाखविला तर कोणी सांगू शकणार नाही की ह्या निरागस चेहऱ्याचा धनी एक उत्कृष्ट राजकारण पटू आहे जो राजकारणाच्या चौसरात, विरोधकांच्या पाचवीला पुजलेला राजकारणी गड्याचा हा चेहरा असेल. कदाचित त्यांच्या वडिलांकडून मिळालेली प्रगल्भ राजकारणी वृत्ती आणि त्यांची निस्वार्थ जनसेवा ह्याचा मिलाफ म्हणजे निरागस चेहरा देवेंद्र फडणवीसांचा, असा जवाब येणार. इतका निरागस चेहरा अंकित चा देखील. अंकित चे शांत मृदु बोलणे. म्हणजे भाजपा च्या कार्यालयाला शोभेसे. तर अशा अंकित ला येण्याचे प्रयोजन सांगितले, पुस्तकाची एक प्रतिलीपी देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून वाचायला सोपे जावे आणि मला लवकर प्रस्तावना मिळावी. पण अंकित ने नम्र नकार दिला. म्हणाला माझ्या व्यक्तिगत ई-मेल वर पुस्तक आणि प्रस्तावना मिळण्याचा अर्ज पाठवा. मी कळवतो, तुम्हाला काय प्रस्तावने संबंधी त्यांचा निरोप येतो. श्री अंकित ह्यांचे सांगण्याप्रमाणे मी अर्ज आणि पुस्तक पाठवले. साधारण एका आठवड्यानंतर अंकित ला फोन केला. तर अंकित म्हणाला की आपल्या पुस्तकाला प्रस्तावना देण्यासंबंधात होकार आला आहे. आठवडाभऱ्यात तुम्हाला प्रस्तावना अपेक्षित आहे. हूश्श्श्श्श्श्……… शेवटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना मिळणार म्हणून मलादेखील हुरुप आला. साधारण ८ डिसेंबरला मी मेल टाकला. १५ डिसेंबर पर्यंत प्रस्तावनेला होकार आला. त्यानंतर २५ डिसेंबर नंतर रोज न चुकता एक दोन – एक दोन फोन माझे रोजचे सुरू झाले. रोज काही ना काही कारणे सांगून आज मिळेल – उद्या प्रस्तावना मिळेल अशी उत्तरं येवू लागली. आज तुमचे पुस्तक वाचताहेत, प्रस्तावना लिहीण्यास घेतली आहे…. करत करत फक्त कारणे, परिणाम शुन्य कारणे.
आमची लोकशाही खुप मजेशीर आहे. मतं मागायची वेळ आली की कसे ही करुन निवडून येण्यासाठी जनतेची विनवणी करणारे नेते, निवडून आल्यावर तुम्ही कितीही विनवण्या करा. त्यांचे चमचे, हाताखालचे ऑफिस चा स्टाफ तुमची एक तर दिशाभूल करतात किंवा तुमची भेट टाळायचा मार्ग शोधतात. वेबवर दिलेले फोन नंबर कधी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचु देत नाही हे शाश्वत सत्य आहे. बरे! नागपूर मध्ये मी नवीन असलो आणि माझे खुप सारे मित्र आहेत, त्यांच्यापासून मला देवेंद्र चा नंबर मिळू शकत होता किंवा भेट मिळाली असती पण पारदर्शी भाजपाचा पारदर्शी कारभार बघायचा म्हणून मी त्यांच्या ऑफिसमार्गे अर्ज करुन पारदर्शी मार्ग पत्करला. पण आताशा नागपूर भाजपा कार्यालयातून अंकित चे परिणाम शुन्य कारणे, माझ्या वेळेचा खोळंबा करीत होते. आणि माझा भाजपा वरील गडकरींचे वाक्य घुमायला लागले,”चहापेक्षा किटल्या गरम”. ह्याला व्यंकटेश स्तोत्रात मस्त श्लोक आहे,”समर्थाचे घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान”.
आणि माझ्या नागपूर ऑफिस भाजपा, त्रिकोणी मैदानापाशी सुरू झाल्या. भाई देवघरे नावाने माझी रोजची एन्ट्री तुम्हाला त्यांच्या गेटबुकात मिळू शकते. मग रोजचे नवनवीन कारणे मला मिळू लागली. कोणत्याही परिस्थितीत हा पठ्ठा दुसरा नंबर कोणाचा नंबर देत नव्हता. फक्त रोजची कारणे देत होता. आज काय तुमची प्रस्तावना तयार आहे. फक्त साहेबांची सही राहिली आहे. मग म्हणे त्यात करेक्शन सांगितले आहे. उद्या या. परत भाई देवघरे गेटबुकात एन्ट्री – आज अरे! विधान परिषद अधिवेशन साहेबांना वेळ नाही – दोन चार दिवसांची गॅप – भाई देवघरे परत गेटबुकात एन्ट्री – आज मी साहेबांचा पीए राजुरकर ह्यांच्या शी बोललो अंकित म्हणे आज होवून जाईल. उद्या या – मी धीरोदत्त सहनशक्तीची पराकाष्ठा सहन करीत – चहापेक्षा किटल्या गरम – मग एक दिवस फोन केला. फोन कुणी चेतन ने उचलला. त्यांच्याकडून ऑफिसचा ऑफिशियल ई-मेल घेतला. अंकित चा मोबाईल नंबर घेतला. आणि अंकित ला मध्ये ठेवून ई-मेल स्मरण परत्वे २ ई-मेल पाठवले – परिणाम शुन्य. एक ही उत्तर नाही. ट्विटरवर देवेंद्र फडणवीसांना ट्विट पाठवले. परिणाम शुन्य.
पण हिंमत न हारता रोजचे माझे प्रयत्न सुरू आहेत. आज काय सुधारणा करण्यास श्री पाठक ह्यांचे कडे आहे. दरम्यान अंकित ला रोज व्हॉट्स ॲप वर निरोप पाठवणे सुरू होते. पण परिणाम शुन्य उत्तर यायची. फोन केला की त्याचा मेसेज यायचा, “Can I call you back” पण त्याचा आपणहून फोन कधी आला नाही. मी मात्र शांत, समर्थाचे घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान. ह्या भुमिकेत.
शेवटी काल मी चार दा फोन केला ८ – जानेवारी २०२२ शनिवार काल, त्याचा निरोप आला की तुमचे काम झाले आहे. देवेंद्र साहेब नागपुरात आहे. तर म्हटले पाठव ती साहेबांची प्रस्तावना ई-मेल वर किंवा मी येतो चार वाजता. म्हणाला मी आईला सोडायला जात आहे. नंतर या. आता त्यानंतर त्याचा फोन नाही की माझी प्रस्तावना पण मला मिळाली नाही.
आज सकाळी ऑफिसला फोन केला तर रविवारी ९-जानेवारी२०२२ कळले साहेब दौऱ्यावर आहेत. मग शिरस्त्याप्रमाणे अंकित ला फोन केला. “समर्थाचे घरीचे श्वान – उचलत नाही सामान्य जनांचा फोन” मग व्हॉट्स ॲप वर मेसेज पाठवला,” Good Morning Ankit. Any updates. Please advise what to do? I am willing to meet him.”
चहापेक्षा किटल्या गरम असे उत्तर आले,”Book Publish karun taka”

आणि प्रचिती आली गडकरी साहेबांच्या वाक्याची प्रचिती आली,”चहा पेक्षा किटल्या गरम” नेता भाजपाचा असो किंवा कुठल्याही पार्टीचा.
एकदा तुम्ही निवडून आले की सामान्य जनतेच्या वेळेला कस्पटासमान समजणाऱ्या नेत्यांना आणि त्याच्या कार्यालयीन श्वानांना , कुठलीही यंत्रणा वठणीवर आणू शकत नाही ही आपली शोकांतिका आहे. आता पुस्तकात प्रस्तावना “चहापेक्षा किटल्या गरम” छापणे केव्हांही सोयिस्कर.

भाई देवघरे

Leave a Reply