संपादकीय संवाद – ५ राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली

अखेर निवडणूक आयोगाने काल देशातील ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होणार किंवा नाही, याबाबत संदिग्धता होती, मात्र सर्वच राजकीय पक्षांचा निवडणुका वेळच्या वेळीच व्हाव्या,असा आग्रह होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेत काल रीतसर घोषणा केली आहे.
या ५ राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. यापैकी उत्तरप्रदेश मध्ये भाजपची सत्ता आहे, तर पंजाबमध्ये काँग्रेसची. गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड इथे परिस्थिती कायम तळ्यात मळ्यात अशीच राहिली आहे. या सर्वच ठिकाणी सत्ता मिळवणे हे केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपसमोर खरे आव्हान राहणार आहे.
या निवडणुकांना एक वेगळे महत्व प्राप्त झालेले असते, आज काही वृत्तपत्रांनी या मिनी लोकसभा निवडणुका आहेत, असे वर्णन केले आहे. ते योग्यही आहे. पूर्वी उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड मिळून एक राज्य होते, त्यावेळी हे राज्य देशाचा पंतप्रधान ठरवते असे म्हटले जायचे. त्याचबरोबर याच परिसराच्या लागून असलेल्या पंजाबीचीही परिस्थिती तीच आहे. हे सीमेवरील राज्य आहे, त्यामुळे संवेदनशील प्रदेश म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना विशेष महत्व आहे. इथे आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, २०२२ मध्येच राष्ट्रपतीपदाची निवडणूक होऊ घातली आहे, या निवडणुकीत सर्व राज्यांचे आमदार मतदान करत असतात, त्यामुळे जास्तीत जास्त जागा निवडून आणणे हे भाजपला आवश्यक आहे.
या ५ राज्यांपैकी उत्तरप्रदेशमध्ये भाजपला जनाधार चांगला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता नक्की आहे, फक्त आता जागा किती वाढवायच्या हे योगी आदित्यनाथ यांच्यासमोर आव्हान आहे. कारण इतर राज्यांमध्ये कमी पडलेल्या जागा उत्तरप्रदेशमध्ये वाढवून राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला तुल्यबळ बनवायचे ही भाजपची रणनीती आहे. पंजाबमध्ये भाजपला फारसा जनाधार नाही. गेली अनेक वर्ष भाजप आणि पंजाबमधला प्रमुख पक्ष अकाली दल यांची युती होती, मात्र नव्या कृषी कायद्यांमुळे नाराज होत अकाली दलाने ही युती तोडली. आता काँग्रेसमधून फुटून बाहेर निघालेल्या अमरिंदरसिंग यांच्या पक्षाशी भाजपची युती आहे. ही युती भाजपला किती जागा मिळवून देईल हे आज सांगणे कठीण आहे. इथे आम आदमी पक्षानेही जोर मारला आहे. हे बघता चित्र कसे राहील हे सांगता येत नाही.
आम आदमी पक्षाने गोव्यातही जोर मारला आहे. त्यांच्यासोबत इथे तृणमूल काँग्रेसही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हेही मैदानात आहेत. या सर्वांच्या लढाईत होणारे मतविभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकेल, उत्तराखंड आणि मणिपूर येथेही भाजपचे वजन चांगले आहे, त्यामुळे इथे भाजप सत्तेजवळ जाईल असा अंदाज व्यक्त होतो आहे.
सत्ता कुणाचीही येवो मात्र येणाऱ्या सत्ताधारी पक्षाने स्थिर सरकार द्यावे आणि जनसामान्यांचा विचार करावा हीच सर्वसाधारण मतदारांची अपेक्षा आहे. या सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणते सरकार सत्ते येते यासाठी १० मार्च पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत या निवडणुकांच्या रणधुमाळीचा अनुभव संपूर्ण देशाला घ्यायचा आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply