रेल्वे रुळावर काम करणाऱ्या महिलांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू

नागपूर : ९ जानेवारी – काटोल तालुक्यातील मेंढेपठार-लाखोळी रेल्वे परिसरातील रेल्वे रुळाचे काम कमणाऱ्या दोन महिला मजुरांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यूू झाल्याची घटना सायंकाळी काटोल रेल्वे पोलिस हद्दीत घडली. शोभा शिवचरण नेहारे (वय ५२, रा. खुंटाबा) व प्रभा प्रल्हाद गजभिये (वय ५0, रा. वाघोडा) असे मृत महिलांची नावे आहे.
सविस्तर वृत्त असे की, मृत शोभा, प्रभा व इतर मजूर रेल्वे पटरीवर पेटिंग व गिट्टी बाजूला करण्याचे काम करीत असताना अचानक आलेल्या एक्स्प्रेस गाडीने महिला गडबडल्या. काही लगेच बाजूला हटल्या. त्यात एक महिला बाजूला होत असताना बचावली. पण, शोभा आणि प्रभा या गाडीखाली आल्याने दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेमुळे वाघोडा व खुंटाबा गावात शोककळा पसरली आहे. मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर-दिल्ली तिसऱ्या लाईनचे काम सुरू आहे.
या कामावर कंत्राटदाराने स्थानिक मजुरांना ठेवले असून, यातून काटोल तालुक्यातील बहुसंख्य महिला कामावर नियमितपणे आहे. परंतु, मजुरांना कामावर सुरक्षितेसंबंधी सूचना, विशिष्ठ कामावरील गणवेश, हेल्मेट आदी पुरवठा करणे आवश्यक आहे. ज्या ट्रकवर रेल्वे धावत आहे. त्यासंबंधी सूचना कामावरील व्यवस्थापकांनी मजुरांना देणे आवश्यक आहे. रेल्वे स्टेशनमार्फत रेल्वे चालकाला काम सुरू असल्याचे भ्रमणध्वनीद्वारा सूचना देणे आवश्यक असताना यातील मजुरांना सूचना न मिळाल्याने आजची दुर्घटना घडली. याबाबत कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे स्टेशन मास्टरांना दिले आहे. मृतदेह काटोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याठिकाणी पोहोचून पीडितांना न्याय मागू लागले. दोन्ही महिला घटनेत मृत पावल्याने परिवारावर संकट कोसळले आहे. काटोल सिटीझन फोरम यांनी घटनेची चौकशी व परिवाराला भरीव मदतीची मागणी केली आहे.

Leave a Reply