राज्य निवडणूक आयोग कुणाचे ऐकते, कुणाच्या इशाऱ्यावर चालते, हे स्पष्ट – नाना पटोले

नागपूर : ९ जानेवारी – राज्य निवडणूक आयोग कुणाचे ऐकते, कुणाच्या इशाऱ्यावर चालते, हे स्पष्ट झाल्याने महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात, ही मागणी करण्यात अर्थ नाही, अशी नाराजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
नागपूरला आले असता पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यातील नगरपंचायत आणि भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. ओबीसी आरक्षण व करोना स्थिती लक्षात घेऊन या निवडणुका घेऊ नये, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. निवडणूक आयोगाकडे हा निर्णय पाठवल्यानंतरही निवडणुका जाहीर केल्या. यावरून त्यांचे काम कुणाच्या इशाऱ्यावरून चालते हे स्पष्ट होते.
विधानसभा निवडणूक होणाऱ्या सर्व राज्यांत काँग्रेस तयार आहे. शेतकरी, गरीब, छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांपासून जनतेला विचलित करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. सत्तेच्या बाहेर असले की ‘देश को बचाना है’ आणि सत्तेत असले की स्वत:ला वाचवणे, अशी त्यांची घोषणा असते. त्यांची ही भूमिका जनतेने ओळखली आहे. त्यामुळे अनेक राज्यांत काँग्रेसची सत्ता येईल, असा दावाही पटोले यांनी केला.
राज्यातील मंत्र्यांविरोधात आमदारांमध्ये नाराजी असल्याचा नाना पटोले यांनी इन्कार केला. आमदार, कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना भेटणे चुकीचे नाही, मंत्र्यांबाबत नाराजी असल्याची काही कल्पना नाही व तशी तक्रारही आलेली नाही. राज्यात पक्षाचे सर्व नेते एकजुटीने काम करत असल्याने आमच्याकडून जनतेच्या फार अपेक्षा आहे, असा दावाही त्यांनी केला.

Leave a Reply