या निर्बंधांमुळे लोकांची फार कोंडी होणार नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर : ९ जानेवारी – राज्य सरकारने करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जाहीर केले. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारने आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप केला. यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकार नियम बनवताना किंवा निर्बंध लावताना कुठं राज्य सरकारला विश्वासात घेतं आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. केंद्र सरकारने कोणत्याच राज्य सरकारला विश्वासात घेऊन नियमावली लागू केलेली नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विजय वडेट्टीवार म्हणाले, “आरोग्याशी संबंधित राज्याच्या हिताचा विषय असेल तर राज्य सरकार परिस्थिती पाहून नियम बदलत असते. उद्या करोना स्थिती कमी झाली तर नियम बदलावे लागतील. चंद्रकांत पाटील महाराष्ट्राबाबत असं बोलतात, पण बाकीच्या राज्यांमध्ये नियम लावताना त्यांनी किती विरोधी पक्षांना सोबत घेतलं आहे.”
“इतर राज्यात असं काही झालंय का? सरकार म्हणून जबाबदारी असते. ती जबाबदारी पार पाडावी लागते. चंद्रकांत पाटलांना प्रत्येक ठिकाणी विश्वास हवा असेल तर त्यांनी मोदींनाही विरोधी पक्षाला विश्वासात घ्यायला सांगावं,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपाला टोला लगावला.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “सध्या तरी राज्यात ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्या अजूनही मर्यादित आहे. त्याची तीव्रता काय, किती रूग्णांना ऑक्सिजन लागेल हे येणाऱ्या काळात कळेल. ज्यांनी करोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना फार त्रास होत नाहीये. मात्र, लस न घेणाऱ्यांना ऑक्सिजनची गरज लागत आहे, असं काही ठिकाणी दिसतंय. त्यामुळे आम्ही लसीकरणावर देखील भर देत आहोत.”
“सध्या करोना रूग्णांची संख्या रोज दुप्पट होत आहे. आत्ता ५ राज्यांच्या निवडणुका घोषित झाल्यात. त्यात निवडणूक आयोगाने कुठेही सभांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक सभांशिवाय होणारी ही कदाचित पहिली निवडणूक असावी. केंद्र, निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार जे निर्णय घेत आहे ते लोकांच्या हितासाठी घेत आहे. या निर्बंधांमुळे लोकांची फार कोंडी होणार नाही,” असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

Leave a Reply