मिसेस मुख्यमंत्री – भाग : ३

(राजकीय दीर्घकथा – लेखक अविनाश पाठक )

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी एक लक्ष्यवेधी सूचना कामकाजाच्या यादीत आलेली प्रशांतने पाहिली. त्यावरचे सरकारी उत्तरही आले होते. ते उत्तर बघता त्यात आश्विनी खासनीसांना गुंतवण्याचा प्रयत्न होतो आहे असे त्या उत्तराचा अभ्यास केल्यावर लक्षात आले. त्यादिवशी ही लक्ष्यवेधी चर्चेला येण्यापूर्वी आधीच्या लक्ष्यवेधी सूचनेवरील चर्चेत विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित करून प्रशांतने सरकारला चांगलेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्या वादावादीत सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक पाटील यांच्या एका उत्तराने सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. हा गोंधळ सतत चालू राहील ही काळजी प्रशांतने घेतली. परिणामी सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले. ती लक्ष्यवेधी आपसूकच दुसऱ्या दिवशीच्या कामकाजात ढकलली गेली. दरम्यान प्रशांतने या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली होती. गोंदियाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आश्विनीला निलंबित करण्याचा आग्रह धरणार हे त्याला आधीच कळले होते.
त्या दिवशी प्रशांतने लगेचच आश्विनीला फोनवरून ही माहिती दिली आणि संध्याकाळी भेटायला सांगितले. कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून प्रशांत किंवा आश्विनीच्या घरी न भेटता अज्ञात स्थळी भेटायचे ठरले. त्याठिकाणी भेटीत प्रशांतने पूर्ण प्रकरण समजवून घेतले. जवळजवळ ७० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या प्रकरणात झाला होता. यात प्रकल्पाचे कंत्राटदार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांचे साटेलोटे असल्याचेही आश्विनीने सांगितले. तिथे अडथळे आणल्यामुळेच तिच्याविरुद्ध हे कारस्थान केले गेले होते. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ही लक्ष्यवेधी सूचना चर्चेला आली. आज प्रशांत देशमुख पूर्णतः तयारीत होते. सुरुवातीला त्या जिल्ह्यातल्या आमदारांनी त्यांची बाजू मांडत गोंदिया जिल्हापरिषदेच्या तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची किंवा सुटीवर पाठवण्याची मागणी केली. मात्र प्रशांत पूर्ण तयारीत होता. त्याने सर्व मुद्दे पुराव्यासकट सभागृहात मांडले. त्यामुळे लक्ष्यवेधी आणणारे आमदारही चांगलेच हादरले. बरीच खडाजंगी झाल्यावर शेवटी या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि विभागीय आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या प्रकल्पात राजकीय हस्तक्षेप कितपत झाला याची सखोल चौकशी करावी असे आदेश विधानसभाध्यक्षांनी दिले. एकूणच या प्रकरणातून आश्विनीला सहीसलामत बाहेर काढण्यात प्रशांतला यश मिळाले. त्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास आश्विनी प्रशांतच्या घरी पोहोचली. प्रशांत घरी नव्हता. मात्र शालिनीताई आणि मधुकरराव दोघेही घरी होते. आश्विनीनेच त्यांना सभागृहात घडलेला किस्सा सांगितला आणि त्यांना पेढे दिले. दोघांच्याही पाया पडून तिने आशीर्वाद घेतले. तितक्यात प्रशांतही तिथे पोहोचला. “आमदार साहेबांच्या समयसूचकतेमुळे आणि प्रयत्नांमुळे आज मी वाचले अन्यथा आज अतिरिक्त जिल्हाधिकारी आश्विनी खासनीस निलंबित झाल्याची बातमी टिव्हीवर आली असती” असे सांगून तिने कृतज्ञता व्यक्त केली. “तुमची बाजू खरी होती ती मांडण्याचे काम मी केले” इतकेच असे सांगून प्रशांतने श्रेय घेण्यास नकार दिला.


दिवसामागून दिवस जात होते. आश्विनी आणि प्रशांत या दोघांमधले आणि देशमुख परिवारामधले स्नेहबंध अधिकच दृढ होत होते. संक्रांतीच्या दरम्यान आश्विनीचे वडील सुधाकरराव खासनीस आणि आई माधुरीताई हे दोघेही नागपुरात आले होते. त्यावेळी दोन्ही परिवारांमध्ये पुन्हा स्नेहभेटी झाल्या आणि संबंध अधिकच दृढ झाले. या दरम्यान प्रशांतच्या मतदारसंघाच्या कामामध्ये शक्य तितक्या जास्त सहभाग आश्विनी दर्शवत होती. तिच्या प्रशासनिक कामातही कुठे अडले तर प्रशांत सहकार्य करत होता. एकूणच दोघांमध्येही मैत्री वृद्धिंगत होत होती. या दोघांमधले स्नेहबंध मैत्रीचा टप्पा ओलांडून अजून पुढे तर जात नाही ना अशी शंका शालिनीताईंना आली आणि एके दिवशी त्यांनी मधुकररावांजवळ हा विषय काढला. ते दोघे मैत्रीच्या मर्यादा ओलांडून नेहमीकरता एकत्र येत असतील तर तुला काही हरकत आहे का असा प्रश्न विचारून मधुकररावांनी शालिनीताईंना निरुत्तर केले. मग दोघांनीही पहिले प्रशांत आणि मग आश्विनीला चाचपून बघायचे ठरवले. त्यादिवशी दुपारी प्रशांत घरी जेवायला आला. त्यावेळी शालिनीताई एकट्याच होत्या. “प्रशांत आता तू पस्तीशीला येतो आहेस. तुझं सर्वकाही स्थिरस्थावर आलं आहे. अजून किती दिवस तू लग्नाला उशीर करणार?” असा प्रश्न विचारून शालिनीताईंनी विषयाला हात मारला. “बघू नं आई, आता काय घाई आहे?” असे म्हणत प्रशांतने विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दिवशी शालिनीताईंनी प्रश्न निकालात काढायचा असेच ठरवले होते. त्यामुळे त्या मागेच लागल्या. “आई माझ्या बघण्यात मला लायक अशी कोणी मुलगी आलेली नाही. तुझ्या बघण्यात असेल तर सांग, वाटल्यास मी हो म्हणेल” असे उत्तर देऊन प्रशांतने चेंडू शालिनीताईकडेच टोलावला. “बघ बरं मी सांगितल्यावर नाही म्हणू नकोस” असे शालिनीताईनी म्हणताच “आई तू सांग तर खर” असं म्हणून प्रशांतने त्यांना आग्रह केला. “प्रशांत तुला आश्विनी कशी वाटते?” या शालिनीताईच्या प्रश्नाने प्रशांत क्षणभर दचकलाच. “काहीतरीच काय आई, त्या आयएएस अधिकारी आहेत, चांगल्या क्वॉलिफाईड आहेत. माझ्यासारख्या राजकारण्याला त्या हो म्हणतील का?” प्रशांतच्या प्रश्नावर शालिनीताईवर उत्तर तयार होतेच. “ती क्वॉलिफाईड आहे. हे मान्य, पण तुही कुठे कमी आहेस? तू उच्चशिक्षित आहेस. एक आमदार म्हणून तुझे समाजात स्थान आहे. शिवाय घरची शेतीवाडी आहे. तुझा कारखानाही आहे. आर्थिकदृष्ट्या तू संपन्न आहेस आणि सामाजिक दृष्ट्या तिच्या इतक्याच किंबहुना जास्त तू प्रतिष्ठित आहेस”. शालिनीताईच्या या युक्तीवादावर प्रशांतजवळ उत्तर नव्हते. तरीही तत्काळ हो म्हणायला तो तयार नव्हता. “मी हो म्हटलेही तरी त्या हो म्हणतील का?” असा प्रश्न विचारताच “मी बोलते तिच्याशी, पहिले तुझं काय मत आहे ते सांग”, असे म्हणून शालिनीताईंनी प्रशांतची चांगलीच नाकेबंदी केली. शेवटी “विचार करून तुला उत्तर देतो” असे सांगून त्याने सुटका करून घेतली. आईला टाळून प्रशांत निघाला खरा पण त्याचे विचारचक्र सुरु झाले. “आई म्हणते त्या प्रस्तावावर विचार करायला काय हरकत आहे असे त्याचेही मन म्हणू लागले. आश्विनी खासनीस या देखण्या आहेत, आपणही कुठे कमी नाही. त्या शिक्षणात जितक्या आघाडीवर आहेत तसाच मीही आहे. त्या सनदी अधिकारी झाल्या तर मी आमदार आहे. वयानेही मी पस्तीशीचा तर त्या तिशीतल्या आहेत. मग अडते कुठे? पण त्या हो म्हणतील का? त्यांना विचारून बघायला काय हरकत आहे? त्यापेक्षा हे काम आईवरच सोपवू या” असे म्हणून त्याने शालिनीताईंनाच हे सांगायचे ठरवले. अपेक्षेनुसार पुढच्या दोन-तीन दिवसातच शालिनीताईनीच प्रशांतला गाठले. “प्रशांत परवा आश्विनीबाबत बोलले होते. त्याबाबत तू काय विचार केलास?” असा प्रश्न समोर येताच तयारीत असलेल्या प्रशांतने तत्काळ उत्तर दिले. “आई माझ्याकडून काही हरकत नाही. मात्र त्यांना विचारायचे कसे हा खरा मुद्दा आहे. तू बोलतेस का त्यांच्याशी?” असे म्हणून प्रशांतने आईवरच ही जबाबदारी सोपवली. “ठीक आहे मी करते ते काम तू काळजी करू नकोस” असे सांगून शालिनीताईंनी त्याला आश्वस्त केले.


शालिनीताईंनी विचार करून आश्विनी खासनीसांना सहज एक दिवस फोन केला आणि त्यांना दुपारचे घरी बोलावून घेतले. योगायोगाने त्या दिवशी प्रशांत मुंबईत होता. दुपारची वेळ असल्यामुळे मधुकरराव, प्रदीप आणि प्रज्ञा कुणीच घरी नव्हते. आश्विनी येताच थोड्या प्राथमिक गप्पा आटोपल्या आणि शालिनीताईनी सरळ विषयालाच हात घातला. “आश्विनी, त्यादिवशी तू जेवायला आली असताना तुझ्या जोडीदाराचा विषय काढला होता. त्या दिवशी जोडीदार मिळाला की मी लग्न करीन असे तू सांगितले होतेस. तुला योग्य जोडीदार सुचवला तर तू विचार करशील कां?” असा प्रश्न विचारताच “मावशी तुम्ही सुचवा तर, मी निश्चित विचार करीन” असे आश्वासन आश्विनीने दिले. “बघ, मी तुला सुचवते आहे, तुला पटले तर हो म्हण, नाहीतर नाही म्हणायचा पूर्ण अधिकार आहे आणि तु नाही म्हटलेस तरी आपल्या संबंधात कुठेही बाधा येऊ द्यायची नाही, हे मान्य असेल तरच मी बोलते”.”मावशी तुमची अट मान्य आहे, मला तुम्ही तुमचं प्रपोजल सांगा” अशी उत्स्कुता आश्विनीने दाखवल्याने शालिनीताईही सुखावल्या. “मग आता तुला विचारते, तुला आमचा प्रशांत जोडीदार म्हणून आवडेल का?” शालिनीताईचे या प्रश्नांवर आश्विनी क्षणभर गडबडली. मात्र दुसऱ्याच क्षणी सावरून घेत तिने प्रतिप्रश्न केला. “मावशी, आमदार साहेबांना हा प्रस्ताव मान्य आहे का त्यांच्याशी तुम्ही बोललात?” या प्रश्नावर शालिनीताई लगेच उतरल्या, “हो मी त्याच्याशी बोलली आहे, त्याची तयारी बघितल्यावरच मी तुझ्याशी हा विषय काढला. बघ तुम्ही दोघेही उच्चशिक्षित आहात. सर्वच बाबतीत एकमेकांना अनुरुप आहात. आमची हुंडा-मानपान याची कोणतीही अट नाही. फक्त तुम्हा दोघांची पसंती ही महत्त्वाची आहे. तुझी तयारी असेल तर तसे सांग म्हणजे पुढच्या हालचाली करता येतील”. शालिनीताईच्या या सविस्तर उत्तरावर क्षणभर विचार करीत आश्विनीने लगेच विचारले. “मला थोडा विचार करायला वेळ द्याल का?” “हो तू पूर्ण विचार कर, आणि मगच तुझा होकार किंवा नकार कळव तोवर मी हा विचार कोणाशीही बोलणार नाही आणि तुझा होकार असेल तर आनंदच आहे, नसेल तरी हा विषय विसरून आपण पूर्वीसारखे मैत्रीचे संबंध कायम ठेवू” असे सांगून शालिनीताईंनी विषय आटोपता घेतला. शालिनीताईचा हा प्रस्ताव ऐकून आश्विनी चांगलीच विचारात पडली होती. विशेषतः आमदार देशमुखांचा आपल्यासाठी होकार आहे हे कळल्यावर तिची खूपच द्विधा मनःस्थिती झाली होती. एक मन म्हणत होते की काय हरकत आहे? दुसरे मन लगेच त्याला विरोध करीत होते. आयएएस अधिकारी झाल्यावर तिने बरीच महत्त्वाकांक्षी स्वप्ने बघितली होती. एका राजकारणी व्यक्तीशी लग्न केले तर आपण अडचणीत तर येणार नाही ना आणि आपल्या पुढच्या वाटचालीत अडथळे तर निर्माण होणार नाही ना अशी शंका तिच्या मनात वारंवार येत होती. काय करावे याबाबत तिचा निर्णय होत नव्हता. एका क्षणी तिला प्रशांत हा आयुष्यातला सहचर म्हणून आवडत होता. मात्र दुसऱ्याच क्षणी करिअरचा विचार येत होता. तसा विचार करता आयएएस अधिकारी आणि आमदार किंवा खासदार अशी जोडपी कधी फारशी पाहण्यात आली नव्हती. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल किंवा नाही याबाबत तिच्या मनात शंका होती. काय करावे या विचारात तिने एक दिवस घालवला. शेवटी आपण आपल्या आईशी बोलू या असा विचार तिने केला. आईशी बोलायचे ठरवले खरे पण विषय कसा काढावा हा तिच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एरव्ही मोठमोठे राजकारणी, वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार या सगळ्यांशी सहज बोलणार्या आश्विनीला आपल्या लग्नाचा विषय आईशी कसा बोलावा हा प्रश्न पडला होता. शेवटी तिने हे काम शालिनीमावशीवरच सोपवायचे असा निर्णय घेतला आणि लगेचच त्यांना फोन करून “तुम्ही आईशीच बोला” असे सांगून ती मोकळी झाली.


दुसऱ्याच दिवशी शालिनीताईंनी माधुरीताई खासनीसांना फोन लावला. आपल्या मनात आलेला विषय त्यानंतर प्रशांतशी झालेले बोलणे आणि त्यानंतर आश्विनीशी झालेली चर्चा हे सर्व काही त्यांनी माधुरीताईच्या कानावर घातली. आणि त्यांचे मत विचारले. माधुरीताईंनाही हा प्रस्ताव आवडला. त्यांनी लगेचच आश्विनीशी बोलून हा विषय निकालात काढायचे ठरवले. त्यापूर्वी त्यांनी आश्विनीच्या वडिलांशी बोलून त्यांचेही मत विचारता घेतला आणि त्यांचा होकार दिसताच पुढची पावले उचल्याचे ठरवले. त्या रात्री जेवणे आटोपल्यावर आश्विनी टिव्हीवरच्या बातम्या बघत होती. माधुरीताईंनी आवरासावर आटोपली आणि आश्विनीसमोर बसल्या. “आश्विनी तुला वेळ असेल तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.” हा प्रश्न ऐकताच आश्विनीचे बाबाही तिथे आले आणि “तुझ्या आईबरोबर मलाही बोलायचे आहे” असे सांगून तेही समोर बसले. आई- बाबा समोर आल्यावर आश्विनी जरा चपापलीच. आता हे काय विचारणार असा विचार करीत असतानाच आईने विषयाला सुरुवात केली. “आश्विनी आज मला शालिनीताई देशमुखांचा फोन आला होता”. आईचे हे बोलणे ऐकताच आश्विनीच्या मनावरचे टेंशन जरा कमी झाले. शालिनीताई काय म्हणाल्या हे माधुरीताईंनी सांगितल्यावर “आई-बाबा तुम्हा दोघांचे त्यांच्या प्रस्तावावर नेमके काय मत आहे?” असा प्रश्न विचारून आश्विनीने त्यांनाच कोड्यात टाकले. मात्र माधुरीताई तयारीतच होत्या. “आम्हा दोघांची पूर्ण चर्चा झाली आहे. आमच्या दृष्टीने काहीही हरकत नाही मुलगा चांगला आहे. घरची शेतीवाडी आहे. शिवाय प्रशांतचा भागीदारीत कारखानाही आहे. मुलगा उच्चशिक्षितही आहे. निर्व्यसनीही आहे. राजकारण हे वळवावरचे पाणी असते हे मान्य केले. तरी घरचे शेतीचे आणि कारखान्याचे उत्पन्न आहेच. शिवाय तुझीही नोकरी चालू राहणारच आहे. त्यामुळे तू तुझे मत सांग” असे सांगून त्यांनी आश्विनीसमोर चेंडू टोलावला. आईने हा प्रश्न विचारल्यावर क्षणभर आश्विनी विचारात पडली. देशमुख मंडळींचाच तर होकार होताच. स्वतः आमदार देशमुखही तयार असल्याचं शालिनीमावशींनी सांगितले होते. आता आई-बाबा ही तयार आहेत. आता आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा. “आई मी या क्षेत्रात आली ते करिअर करायला. प्रशांत देशमुख हे राजकारणी आहेत. अनेकदा प्रशासनिक अधिकारी आणि राजकारणी यांच्यात संघर्षही येतात. उद्या त्यांची राजकीय वाटचाल माझ्या करिअरच्या आड येऊ नये असं मला वाटते”. आश्विनीने आपले मत मांडले. माधुरीताई काही बोलणार तोच इतका वेळ शांतपणे ऐकणाऱ्या सुधाकररावांनी बोलायला सुरुवात केली. “हे बघ आश्विनी, एकूणच तुझे आणि आमदार देशमुखांचे गेल्या सात-आठ महिन्यातले संबंध आणि त्यायोगे आलेले अनुभव लक्षात घेता ते तुझ्या करिअरच्या आड येतील असे वाटत नाही. देशमुख परिवारही तसा उदारमतवादी दिसला. त्यांची मोठी सून ही देखील नवऱ्याबरोबर वकिली करते. त्यामुळे इथे तुला अडचण होईल असे मला वाटत नाही आणि उद्या त्यांच्या राजकारणाच्या दरम्यान कुठे तुला अडचण निर्माण झाली तर ते समर्थपणे सोडवणूक करायला तुझ्या बाजूने उभे राहतील याची मला खात्री आहे. आताच डिसेंबरच्या अधिवेशनात तुझ्याविरुद्धची लक्षवेधी सूचना त्यांनी एकट्याच्या बळावर परतवून लावली होतीच ना. त्यामुळे तुझा मुद्दा बाजूला ठेवून तू त्यांना होकार द्यावास असं मला वाटतं”. सुधाकररावांचं म्हणणं ऐकून आश्विनी विचारात पडली. ती विचार करत असतानाच माधुरीताई बोलल्या. “माझंही तेच मत आहे आश्विनी, तुझं करिअर सुरुच राहील. त्यात प्रशांत देशमुखांचा तुला फायदाच होईल. आणि उद्या ते मंत्री झाले तर तुला कलेक्टर किंवा सेक्रेटरीबरोबर मंत्रीणबाई म्हणूनही मिरवायला मिळेलच ना!” माधुरीताईच्या या मिष्किल टिप्पणीवर आश्विनी चक्क लाजली. “चला, आम्हाला हवं ते उत्तर मिळालं. आता उद्या देशमुखांकडे फोन करून त्यांच्याशी भेटू आणि पुढचं कसं ते ठरवू. चालेल ना आश्विनी?” असा प्रश्न सुधाकररावांनी विचारताच आश्विनी लाजून पळाली.

अविनाश पाठक

Leave a Reply