गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ, चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल

जळगाव : ९ जानेवारी – जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या चौकशी प्रकरणी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगाव येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वादातून अँडवोकेट विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटावर निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा कोथरुड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशीसाठी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात धडकले असल्याची माहिती समोर आली असून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे पोलिसांचे पथक सध्या भोईटे कुटुंबीयांसह इतर ठिकाणी झाडाझडती घेत असून महत्त्वाचे धागेदोरे व दस्तावेज पोलिसांकडून हस्तगत केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी पुणे पोलिसांकडून जळगाव पोलिसांकडून याबाबत प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
वाचा : महापौर अॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांनी झापलं
गिरीश महाजन हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून गिरीश महाजन यांना मराठी विद्या प्रसारक संस्था हडप करत होते. मात्र त्यांना तसं न करता आल्याने त्यांनी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी अॅडवोकेट विजय पाटील यांनी केला आहे.
पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबल असल्याचा आरोप करण्यात आले होते.
दरम्यान मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आपल्या विषयी खोटी तक्रार देवून दीड वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तक्रारी खोटी असून या विरोधात आम्ही कायदेशीर लढा देत असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात पुणे पोलिसांची टीम जळगावात दाखल झाली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, गिरीश महाजन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गिरीश महाजन यांची पोलीस चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply