ओंजळीतील फुलं – ११

28 dec mahesh updeo final

विदर्भात शिवसेनेचा प्रवेश

राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक मध्ये शिवसेनेचे वर्चस्व होते. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना घरोघरी पोहिचयला हवी, सर्वसामान्यांना न्याय मिळावा, म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भात शिवसेनेचा प्रसार व्हावा याकरिता शिवसेना नेते सुधीरभाऊ जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी सोपविली.
१९८०-१९९० या दहा वर्षात या शिवसेना नेत्यांनी अक्षरशः विदर्भ पिंजून काढला, व शिवसेनेची फळी उभी केली. १९९० मध्ये शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा अमरावतीच्या सायन्स कोर या मैदानावर झाली. शिवसेना प्रमुखांचे अमरावती शहराशी भावनिक नाते होते. पश्चिम विदर्भात शिवसेनेचा भगवा घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार युवकांपर्यंत पोहावचविण्याकरिता यंत्रणा कामाला लागली. शिवसेना प्रमुखांची दुसरी सभा नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर झाली. तेथूनच शिवसेना प्रमुखांचे विचार वऱ्हाडातील गावागावात पोहोचले. विदर्भातील बेरोजगार युवकांना शिवसेना प्रमुखांचे विचार भावले. आणि युवकांचे जथ्थेच्या जथ्थे शिवसेनेकडे वळले.
१९९०च्या विधानसभा निवडणुकीत अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथून शिवसेनेचे आमदार हनीराम वरखडे निवडून आले. अतिदुर्गम भागात व नक्षलग्रस्त भागात हनीरामच्या माध्यमातून पाड्यापर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार पोहोचले. अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून प्रकाश भारसाखडे बडनेरा मतदारसंघातून प्रदीप बडनेरे अकोला येथून डॉ. जगन्नाथ ढोणे, बोरगाव मंजू मतदार संघातून गजानन दाळू गुरुजी कारंजा मतदारसंघातून गुलाबराव गावंडे, बुलढाणा मतदारसंघातून राजेंद्र गोडे, जलंब मतदारसंघातून कृष्णराव इंगळे, निवडून आले. शिवसेना प्रमुखांचा प्रभाव विदर्भात निर्माण झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे ९ आमदार निवडून आले. शिवसेनेने विदर्भात आपली मुहूर्तमेढ रोवली. शिवसेना प्रमुखांचे विचार कॅसेट च्या माध्यमातून युवकांनी घरोघरी व गावपाड्यांपर्यंत पोहोचविले. चौकाचौकात पानटपऱ्यावर कॅसेट्च्या माध्यमातून युवकांनी पोहिचविले. गावखेड्यात शिवसेनेच्या शाखा व भगवा झेंडा दिसायला लागला.
१९९५ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण विदर्भ पिंजून काढला. या काळात साहेबांच्या सभेचे वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली. मी, मुंबईचे माझे सहकारी आताचे सहायक संपादक विद्याधर चिंदरकर, छायाचित्रकार एकनाथ कदम यांनी बाळासाहेबांच्या जेथेजेथे सभा होत्या त्या ठिकाणचे वार्तांकन करून शिवसेना प्रमुखांचे विचार गावखेड्यापर्यंत पोहोचविले. गावखेड्यामध्ये सर्वत्र भगवा झेंडा फडकायला लागला. शिवसेना प्रमुखांनी विदर्भ पिंजून काढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ११ आमदार निवडून आले. युवकांची फळी गावखेड्यात उभी झाली. त्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरायला लागली.
या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांच्या विराट सभा ऐतिहासिक ठरल्या. विधानसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे अवघ्या चार तासाच्या सूचनेवरून शिवसेना प्रमुखांची ऐतिहासिक सभा झाली. नवखा शिवसैनिक असलेल्या अशोक शिंदे याने मातब्बर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचा दारुण पराभव केला. हा प्रभावाचा धक्का सहन न झाल्यामुळे शरद जोशी यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. गोंदिया येथून रमेश कुथे, आरमोरी रामकृष्ण मडावी, दिग्रस श्रीकांत मुनगिरवर, दर्यापूर प्रकाश भारसाखडे, वलगाव संजय बंड, बडनेरा ज्ञानेश्वर ढाले पाटील, अकोट वासुदेवराव कराणे, बोरगाव मंजू गुलाबराव गावंडे, बुलढाणा विजयराज शिंदे, मेहकर प्रतापराव जाधव हे आमदार निवडून आल्यामुळे विदर्भात शिवसेनेची ताकद वाढली. याच निवडणुकीत विधानसभेवर शिवसेना भाजप युतीचा भगवा फडकला. विदर्भातील शिवसेना प्रमुखांच्या ऐतिहासिक सभा मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यातील या भव्य सभा होत्या. त्या सभांचे केलेले वार्तांकन हा माझ्या आयुष्यातील आठवणींचा ठेवा आहे.

“सामना”चे धडाक्यात आगमन

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूरमधून सामना आवृत्ती सुरु करण्याचे जाहीर केले. सामान आवृत्तीकरिता कार्यालय शोधण्याचे काम सुरु झाले. तेव्हा गृहराज्यमंत्री व पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर होते.
मुंबई येथून राजा प्रधान, दीपक शिंदे नागपुरात आले. या दोघांनी माझ्याशी संपर्क साधला व शिवसेना प्रमुखांचा संदेश मला दिला त्यानंतर आम्ही रात्रंदिवस झपाटून कमला लागलो. पायाभूत सुविधांचा शोध घेणे सुरु केले. जागेचा शोध घेत असतानाच धरमपेठ येथील वेस्ट हायकोर्ट रोडवर एनआयटी कॉम्प्लेक्समध्ये जागा असल्याची माहिती मिळाली. अवघीय दहा दिवसात एनआयटी कॉम्प्लेक्समधील ३० हजार चौरसफुटाचा हॉल आम्हाला मिळाला. ऐन मोक्यावर असलेली ही जागा सर्वांनाच आवडली. तेव्हा माझ्याजवळ टीएफआर लुना होती. या लुनावर बसून दीपक शिंदे, राजा प्रधान सर्व कार्यालयात फिरून आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवल्या. शिवसेना प्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवून सामना आवृत्तीचे काम माझ्यावर सोपविले. सामना कार्यालय नागपुरात सुरु होणार म्हटल्यावर हितचिंतकांच्या फोन व पेजरवर मला संदेश यायला लागले. काही मदत लागली तर महेश मला आवाज दे आम्ही तुझ्या मदतीकरिता येऊ. एमआयटी कॉम्प्लेक्सचे महत्व वाढले. कित्येक वर्ष खाली पडलेला हा कॉम्प्लेक्स सामनाच्या माध्यमातून फुलायला लागला. सामनामुळे इमारतीचे रूप पालटले.

मुहूर्त ठरला

२३ जानेवारीला शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस असतो त्याच दिवशी सामना कार्यालयाचे उदघाटन करायचे ठरले. त्यादृष्टीने मी आणि माझे सहकारी राजा प्रधान, दीपक शिंदे काम करीत होतो. ऑफिसचे इंटेरिअर मुंबई येथून आलेल्या खेर यांनी केले. या दरम्यान सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत साहेब प्रबोधन प्रकाशन चे विश्वस्त सुभाष देसाई साहेब यांनी नागपूर कार्यालयाची पाहणी करून संमती दिली. काही काम पूर्ण व्हायचे असल्यामुळे शेवटी हा प्रकाशन कार्यक्रम थोडा पुढे ढकलण्यात आला.

शानदार प्रकाशन समारंभ

१० फेब्रुवारी १९९७ रोजी शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सामना आवृत्तीचे प्रकाशन नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे झाले. एखाद्या वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ जाहीर सभेत झाला. या प्रकाशन समारंभाला लाखो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योगमंत्री लीलाधर डाके, गृहराज्यमंत्री गजानन कीर्तिकर, विश्वस्त सुभाष देसाई साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब, लहानसा आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला खासकरून उपस्थित होता. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. हा कार्यक्रम इतका शानदार झाला. आजही ही आठवण मी विसरू शकत नाही. कार्यालयाचे उदघाटन उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत यांच्याहस्ते झाले.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या मार्गदर्शनात ही आवृत्ती सुरु झाली. राऊत साहेब व विद्याधर चिंदरकर यांनी आवृत्ती प्रकाशनाच्या १० दिवस पूर्वी नागपुरात येऊन पत्रकारांच्या मुलाखती घेऊन तरुण पत्रकारांची फळी तयार केली. माझ्याकडे मुख्य वार्ताहर पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी नागपूरच्या सर्व वृत्तपत्रांच्या मुख्य वार्ताहरांमध्ये मी तरुण होतो. माझ्यासोबत अतुल पांडे, जयश्री चिटणीस, काका भुसारी, दिलीप दुपारे नरेश शेळके, सुनील काथोटे, तीर्थराज कापगते, श्रीकांत गोडबोले, अतुल पेठकर, प्रवीण टाके रवी गीते, ताजेश काळे, सुनील रामटेके अशी तरुण चमू होती. प्रादेशिक भागाची जबाबदारी अनिल कुचे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. आवृत्तीच्या प्रारंभी विद्याधर चिंदरकर अतुल आंबेरकर, अरुण निगवेकर विवेक गिरिधारी, राजेंद्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्याच दिवसापासून सामनाच्या सर्व बातम्या आक्रमक व न्याय मिळवून देणाऱ्या होत्या. मी विद्यापीठात सुरु असलेले भोंगळ कारभाराची पोलखोल सुरु केली. सामनाच्या पहिल्याच अंकात नागपूर विद्यापीठातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा सुळसुळाट व त्यानंतर बोभाटशाहीची विकृतीशाही या मथळ्याखाली वृत्तमालिका चालवून विद्यापीठाला हादरे दिले. माझ्या सहकाऱ्यांनी आपल्या आपल्या बीटमधील चांगल्या बातम्या देऊन नागपूरकरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सामना मधील वृत्ताची दखल सरकारला घ्यावी लागत होती. ते दिवस मी आजही विसरू शकत नाही.

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply